गुडगाव - पत्नीने फेक फेसबूक अकाऊंट सुरू करून पतीच्या कंपनीतील बॉस आणि सहकाऱ्यांना अश्लील फोटो पाठवल्याने पतीला नोकरी गमवावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरगावमध्ये राहणाऱ्या या पती-पत्नीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या अर्जावर सध्या न्यायलयात सुनावणी सुरू आहे. याचदरम्यान आपल्या पत्नीने खोट्या फेसबूक अकाऊंटचा वापर करून अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप पतीने केला आहे. दरम्यान, प्राथमिक तपासात आरोप योग्य असल्याचे समोर आल्यानंतर सेक्टर - 18 ठाणा पोलिसांनी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक नावाचा तरुण 2014 पासून गुडगावमधील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्याआधी 2011 साली त्याचा विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर काही दिवसांनीच पती पत्नीमध्ये धुसफूस सुरू झाली. सध्या हे पती पत्नी विभक्त राहत असून, त्यांच्यामध्ये घटस्फोटाचा खटला चालू आहे. दरम्यान, 2016 साली अभिषेकच्या पत्नीने त्याच्या नावाने खोटे फेसबूक अकऊंट बनवले. त्यावर त्याचा फोटोही लावला. त्यानंतर या अकाऊंटवरून अभिषेकच्या कंपनीतील सहकाऱ्यांना आणि बॉसला अश्लील फोटो पाठवले. या प्रकारामुळे अभिषेकला कामावरून काढून ठाकण्यात आले. त्यानंतर अभिषेकने पोलिसांत धाव घेऊन तक्रार केली. दरम्यान, प्राथमिक तपासात तक्रार खरी असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित तरुणाच्या पत्नीविरोधात आयटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सेक्टर -18 पोलीस ठाण्याचे एसएचओ चंद्रप्रकाश यांनी सांगितले.
फेक फेसबूक प्रोफाइलवरून पत्नीने कंपनीत पाठवले अश्लील फोटो, पतीची गेली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 3:52 PM