ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 30 - पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणा-या विकृत पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशातील सुरेंद्रनगर येथे. याप्रकरणी शनिवारी पीडित महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली.
लग्नाच्या काही महिन्यांनंतर पती हुंड्यासाठी छळ करू लागला आणि मागणी पूर्ण न झाल्याने माझे आंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये या महिलेचा अयोध्यातील एका व्यावसायिकासोबत विवाह झाला. वडिलांनी लग्नासाठी 30 लाख रुपये खर्च करुन लग्नसोहळ्यात कारसहीत महागड्या भेटवस्तूही सासरच्या मंडळींना दिल्याचे महिलेने सांगितले.
मात्र, हुंडालोभी पतीनं लग्नाच्या काही महिन्यानंतर 10 लाख रुपयांची मागणी करत छळ करायला सुरुवात केली. मागणी पूर्ण न झाल्याने या नराधमाने घर सोडण्यासाठी दबाव आणल्याचा पीडित महिलेने आरोप केला. यावेळी नातेवाईकांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत झाले आणि दोघंही पुन्हा एकत्र राहू लागली.
नातेवाईकांनी समजावल्यानंतर सर्व काही ठिक सुरू होते. मात्र काही काळानंतर त्याने पुन्हा वाईट पद्धतीने छळ करायला सुरुवात केली, असे महिलेने पोलिसांनी सांगितले. पतीमध्ये सुधारणा झाल्यानं महिलादेखील सुखावली होती. यावेळी कुकृत्य करण्याचा कट त्याच्या डोक्यात सुरू आहे, याची पुसटशीही शंका महिलेच्या मनात आली नाही.
याचदरम्यान, त्याने बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावून पत्नीचा आंघोळ करताना व्हिडीओ बनवला आणि हा व्हिडीओ व्हायरल करण्याची वारंवार धमकी देत 10 लाख रुपयांची मागणी केली. अखेर त्याच्या धमक्यांना कंटाळून पीडितेनं पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
हजरतगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नातेवाईकांनी समजावल्यानंतर प्रकरण निवळले होते. याचदरम्यान आरोपी पतीने महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढण्याचा कट रचला. बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.' याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.