Divorce Problem: पत्नीच्या मानसिक छळामुळे वैवाहिक जीवन असह्य झाल्याचे स्पष्ट करत ओडिशा उच्च न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला. पत्नीने वारंवार आत्महत्येची धमकी देणे, पतीवर सतत गुन्हे दाखल करणे आणि त्याच्या वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करणे, यामुळे पतीला गंभीर मानसिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागला. विवाहामध्ये त्रास सहन करण्यास कायदा भाग पाडू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यायमूर्ती बिभू प्रसाद राउत्रे आणि न्यायमूर्ती चित्तरंजन दाश यांच्या खंडपीठाने निर्णय देताना म्हटले की, आत्महत्येची वारंवार दिली जाणारी धमकी ही क्रूरता आहे. पती व त्याच्या कुटुंबीयांना इजा करण्याची धमकी हा छळ व शोषण आहे. अशा वागण्याचा परिणाम वैवाहिक जीवनापुरताच मर्यादित नाही, तर पीडित व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर दीर्घकालीन होतो.
पतीचा आरोप काय?
या जोडप्याचा विवाह ११ मे २००३ रोजी पार पडला होता. काही वर्षे आनंदात गेली, मात्र नंतर दोघांमध्ये तणाव वाढला.
हेही वाचा >>निर्दयतेचा कळस! दत्तक चिमुकलीला दिले चटके, हातपाय मोडून आई वडिलांनीच केला खून
आईवडिलांपासून दूर जाण्यासाठी पत्नीने माझ्यावर दबाव टाकला आणि विमा योजनांमध्ये स्वतःला एकमेव नॉमिनी म्हणून घोषित करण्यासाठी दबाव टाकला. ती सतत वाद घालत असे आणि मानसिक त्रास देत असे, असा आरोप पतीने केला आहे.
पतीविरोधात ४५ एफआयआर
पतीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज केला. पत्नीने या दाव्याला प्रत्युत्तर देत वैवाहिक हक्क मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला. तिने पतीविरोधात ४५ एफआयआर दाखल केले होते. कटकच्या कुटुंब न्यायालयाने पतीच्या बाजूने निर्णय देत पत्नीच्या वर्तणुकीला मानसिक क्रूरता ठरवले.
न्यायालयाने नमूद केले की, पतीच्या आई-वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी बाहेरच्या व्यक्तींचा वापर करणे आणि आर्थिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे, ही गंभीर क्रूरतेची लक्षणे आहेत. या निर्णयाविरोधात पत्नीने ओडिशा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र, ती उच्च न्यायालयानेही फेटाळून लावली.