नवी दिल्ली : सैनिकांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत सोशल मीडियावर आवाज उठवणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाच्या पत्नीने त्याची भेट घेतली. यानंतर, तिने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, त्याची सुरक्षा, स्थितीबाबत मी पूर्णपणे समाधानी आहे.न्या. जी.एस. सिस्तानी व न्या. विनोद गोयल यांच्या पीठाला या दाम्पत्याच्या भेटीबाबत माहिती देण्यात आली. हा सैनिक जेथे कुठे असेल, तेथे त्याच्या पत्नीला त्याची भेट घेऊ द्यावी व दोन दिवस बरोबर राहू द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचे पालन करीत शर्मिला देवी पतीला भेटण्यासाठी गेल्या होत्या व आपल्या वकिलामार्फत त्यांनी न्यायालयाला वरीलप्रमाणे सांगितले. पतीला शोधण्यासाठी जी याचिका दाखल केली होती, ती आता पुढे चालवू इच्छित नाही, असेही सांगितले. जवानाला कोणत्याही प्रकारे बेकायदशीररीत्या कैदेत ठेवलेले नसून, त्याला जम्मूच्या सांबा येथील कालीबाडीमध्ये ८८ व्या बटालियनच्या मुख्यालयात तैनात केलेले आहे, असे तिने सांगितले. यानंतर, न्यायालयाने याचिका रद्दबातल करीत म्हटले आहे की, आता हे प्रकरण संपलेले आहे. सरकार औपचारिकतेचे पालन करीत बसले असते, तर हे प्रकरण कधीच संपले नसते. जवानाची पत्नी आपल्या पतीला भेटली असून, आता तिलाच हे प्रकरण जास्त वाढवायचे नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पत्नीने घेतली बीएसएफ जवानाची भेट
By admin | Published: February 16, 2017 12:46 AM