नवी दिल्ली- ब-याचदा पतीनं अत्याचार केल्याचा घटना समोर आल्या आहेत. न्यायालयानं पतीच्या अत्याचारात पत्नीच्या बाजूनं निर्णय दिल्याचंही ऐकिवात असेल. परंतु दिल्लीच्या न्यायालयानं चक्क पत्नीच्या मारहाणीच्या विरोधात पतीला न्याय मिळवून दिला आहे. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या पतीनं आरोप केला आहे की, त्याची पत्नी त्याला मारहाण करते. त्यामुळे त्याच्या जीविताला धोका आहे. या प्रकरणाची न्यायालयानं गंभीर दखल घेत संबंधित व्यक्तीच्या घरावर लक्ष्य ठेवण्याची जबाबदारी त्याच्या भागातील एसएचओला दिली आहे. तसेच पत्नी करत असलेली मारहाण आणि कथित शिव्यांवर एसएचओला लक्ष ठेवून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.न्यायमूर्ती नजमी वजिरी यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्ते संजीव शर्मा यांना मिळणा-या धमक्यांच्या अनुषंगानं सुरक्षा पुरवली जाणार आहे. तसेच तपास अधिका-याला शर्माच्या पत्नीची बातचीत करण्याचाही सल्ला दिला आहे. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, असंही दिल्ली उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. याचिकाकर्त्यांनी विभागातील पोलिसांना स्वतःचा नंबर द्यावा. जेणेकरून आपत्कालीन स्थितीत पोलिसांशी संपर्क साधता येईल.शर्मा यांच्याकडून वकील आदित्य अग्रवाल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. शर्मा यांची पत्नी त्यांना मारहाण करत असल्याचं याचिकेत मांडलं आहे. शर्मा हे सरकारी शाळेत शिक्षण असून, ते शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत. शर्मा यांच्या माहितीनुसार, त्यांची पत्नी मुलांना आणि त्यांना मारहाण करते. तसेच त्यांच्या तीन गाड्यांचीही पत्नीनं तोडफोड केली होती.
पत्नी करत होती मारहाण, न्यायालयाला फोटो दाखवून पतीनं मिळवली सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 1:22 PM