नवी दिल्ली : विवाहितेने परपुरुषाशी शरीरसंबंध ठेवणे हा फौजदारी गुन्हाच ठरू शकत नाही. फार तर याला दिवाणी स्वरूपाचे गैरवर्तन म्हणता येईल, त्यावर घटस्फोटाचा दिवाणी उपाय उपलब्ध आहे, असे तोंडी मत सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांनी बुधवारी व्यक्त केले.पत्नीच्या व्यभिचारास गुन्हा ठरवून पाच वर्षांच्या कारावासाची तरतूद असलेल्या भारतीय दंड विधानातील कलम ४९७ च्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणाऱ्या याचिकेवरील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढील सुनावणी संपल्यावर निकाल राखून ठेवला गेला. केरळमधील जोसेफ शाईन यांनी ही याचिका केली आहे.कलम ४९७ मुळे समानतेच्या मूलभूत हक्काची पायमल्ली होते. यात विवाहबाह्य संबंध ठेवणाºया पतीस मोकळे रान आहे व फक्त पत्नीलाच गुन्हेगार ठरविण्याची तरतूद आहे, हा याचिकेतील मुख्य आक्षेप आहे. केंद्र सरकारने याला असे उत्तर दिले की, कलम ४९७मधील लिंगभेद करून ते स्त्री व पुरुष दोघांनाही समान लागू करण्यासाठी दुरुस्ती करण्याचा विचार आहे. तोपर्यंत हे कलम आहे तसेच राहू द्यावे. विवाहसंस्था टिकवण्यासाठी हे कलम आवश्यक आहे. या म्हणण्याशी असहमती व्यक्त करीत ताना सरन्यायाधीश म्हणाले की, मुळात कलम ४९७ मागील तर्कसंगती ‘कॉमन सेन्स’ला पटणारी नाही. विवाहसंबंध टिकविणे दाम्पत्यामधील उभयतांची जबाबदारी आहे. एकाने जबाबदारी न पाळल्यास दुसºयाला घटस्फोट घेता येतो. फाटलेले विवाहसंबंध टिकवण्यात समाजाचे काय हित आहे?
पत्नीचा व्यभिचार हा फौजदारी गुन्हाच नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 4:26 AM