काेलकाता : मृत्यू झालेल्या विवाहित मुलाने संग्रहित करून ठेवलेल्या वीर्यावर केवळ त्याच्या पत्नीचाच अधिकार असल्याचा निर्णय देताना पित्याला त्याचा ताबा देण्याची मागणी काेलकाता उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या याचिकाकर्त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. त्याने संग्रहित केलेल्या वीर्याचा ताबा देण्याची मागणी फेटाळताना न्यायालयाने म्हटले, की मृतक विवाहित हाेता. त्याच्या वीर्यावर मृत व्यक्तीशिवाय केवळ त्याच्या पत्नीचाच अधिकार आहे. मृतक मुलगा हा थायलेसेमिया आजाराने ग्रस्त हाेता. भविष्यातील उपयाेगासाठी त्याने दिल्लीतील एका रुग्णालयामध्ये वीर्य संरक्षित करून ठेवले. या संस्थेकडे त्यांनी दान करणाऱ्या व्यक्तीचा पिता या नात्याने वीर्याचा ताबा देण्याची मागणी केली. त्यावर रुग्णालयाने त्यांना मृत व्यक्तीच्या पत्नीची परवानगी आवश्यक असून, विवाह झाल्याचा पुरावादेखील सादर करावा लागेल, असे सांगितले. याचिकाकर्त्याने सुनेला परवानगी देण्याची विनंती केली. मात्र, तिने परवानगी देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती.न्यायालयाचे निरीक्षण -वडील आहात म्हणून मुलाच्या संततीचा ताबा मिळण्याचा अधिकार मिळत नाही. मुलगा विवाहित असून, पत्नीसाेबत राहत हाेता. त्यामुळे केवळ तिचाच अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मृताच्या संग्रहित वीर्यावर पत्नीचाच हक्क, वडिलांना ताबा देण्यास नकार; उच्च न्यायालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 4:34 AM