VVPAT : मागील वर्षी लोकसभा आणि राज्यातील विधेनसेभेच्या निवडणुका पार पडल्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये विरोधकांनी ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित केली. दरम्यान, व्हीव्हीपॅट मशिनवरील मॅन्युअली मोजणीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आज या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.
मतदानादरम्यान व्होटर व्हेरिफायड पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) स्लिपची १०० टक्के मॅन्युअल मोजणी आणि नियंत्रण युनिटद्वारे इलेक्ट्रॉनिक मोजणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवारी) नकार दिला.
बेरोजगारी, महागाई अन् देशातील आर्थिक असमानता..; बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल
सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांचे खंडपीठ या प्रकरणावरील दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध हंस राज जैन यांच्या याचिकेवर विचार करत होते. यावर आज कोर्टाने निर्णय दिला.
CJI ने याचिका फेटाळली
या याचिकेवर सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले की, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणताही आधार मिळाला नाही. ही याचिका फेटाळण्यात येत आहे. अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यापूर्वीही असेच मुद्दे उपस्थित करणारा निकाल दिला होता. एकच वाद पुन्हा पुन्हा होऊ शकत नाही, असंही सरन्यायाधीशांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र डेटाचे VVPAT रेकॉर्डसह १०० टक्के क्रॉस-व्हेरिफिकेशन करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावताना, सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी म्हटले होते की ईव्हीएम सुरक्षित , उपयोगकर्ते अनुकूल आहेत.
मागील वर्षी १२ ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा हवाला देत जैन यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.
जैन यांनी निवडणूक आयोगाला भविष्यात VVPAT प्रणालीचा योग्य नमुना वापरण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती, यामध्ये प्रिंटर उघडा ठेवला जातो आणि छापील मतपत्रिका, जी कापली जाते आणि प्रिंटरमधून बाहेर पडते, ती मतदाराने पडताळणीच्या अधीन असते आणि नंतर ती मतदान केंद्र सोडण्यापूर्वी अध्यक्षीय अधिकाऱ्याला दिली जाते, असं त्यांनी याचिकेत म्हटले होते. नियंत्रण युनिटद्वारे इलेक्ट्रॉनिक मोजणी व्यतिरिक्त, व्हीव्हीपीएटी स्लिपची १०० टक्के मोजणी असावी, असंही त्यांनी यात म्हटले होते.