मुंबई - २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. या प्रकरणात भारताला मोठं यश मिळालं आहे. राणाच्या आत्मसमर्पणसाठी भारतातील अनेक तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत हजर आहेत. तहव्वूर राणावर २००८ च्या मुंबई हल्ल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात १६६ लोकांचा जीव गेला होता. दीर्घ काळापासून भारत तहव्वूर राणाच्या प्रर्त्यापणाची मागणी करत होता. अखेर मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या भेटीला गेले असता या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत अमेरिकेने ही मागणी मान्य केली.
तहव्वूर राणा आयएसआय आणि लष्कर ए तोयबाचा सदस्य आहे. राणा हा डेविड हेडलीचा खास मानला जात होता. हल्ल्याअगोदर तहव्वूर आणि हेडली यांची अनेकदा बैठक झाली. डेविड हेडलीने अमेरिकन तपास यंत्रणेसमोर तहव्वूरचं नाव घेतले होते. हेडली मुंबई हल्ल्याआधीच भारतात आला होता. त्याने मुंबईतील ताज हॉटेल, लियोपोल्ड कॅफेसह अन्य प्रमुख जागांची रेकी केली होती. त्यानंतर आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याद्वारे प्रशिक्षण दिलेले लष्कर ए तोयबाचे दहशतवादी मुंबईत शिरले आणि त्यांनी ताज हॉटेलसह इतर ठिकाणांवर हल्ले केले.
तहव्वूरने हेडलीसाठी बनावट व्हिसा बनवला होता. दहशतवादी हेडलीला भारतात व्यापारी म्हणून पाठवले होते, परंतु त्याचा खरा हेतू इथं दहशतवादी हल्ला करणे होते. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याबाबत तहव्वूरला आधीच माहिती होती. २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या आरोपपत्रानुसार, २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यापूर्वी मुंबईतील पवई इथल्या हॉटेलमध्ये २ दिवस राणा थांबला होता. ११ नोव्हेंबर २००८ रोजी तहव्वूर राणा भारतात आला, तो २१ नोव्हेंबरपर्यंत इथेच होता. त्यात २ दिवस मुंबईतील पवई भागात थांबला होता.
दरम्यान, मुंबई हल्ल्याचं प्लॅनिंग हेडली आणि राणा यांच्यात ईमेलद्वारे झाले होते. त्याचे पुरावे तपास यंत्रणांना मिळाले. हेडलीने राणाकडे पाकिस्तान सैन्याचे मेजर इकबाल यांचा ईमेल आयडी मागितला होता. मेजर इकबाल हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI शी जोडलेला आहे. त्यामुळे २६/११ च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आले. मेजर इकबाल यालाही भारतीय तपास यंत्रणेने तहव्वूर राणा आणि हेडलीसोबत सहआरोपी बनवला आहे. पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर राहिलेल्या भारतातून वॉन्टेड असलेला आरोपी तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिसच्या जेलमध्ये बंद आहे. त्याला भारतात आणणार असून त्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि मुंबईतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.