चंद्रकांत दडस । लोकमत न्यूज नेटवर्क ।हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आता प्रचाराच्या तोफा आणखी जोरात धडाडणार आहेत. राज्यातील सत्तेची समीकरणे समजून घेतली तर गेल्या ३२ वर्षांत काँग्रेस आणि भाजपला आळीपाळीने सरकारमध्ये बसण्याची संधी येथील जनतेने दिली आहे. यावर्षी नेमकी कोणाची सत्ता येईल, हे समजून घेऊ.
पहिले मुख्यमंत्री कोण होते?
१९६२ : पहिल्या विधानसभेपासून हिमाचल विधानसभेवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. १९६२ : विधानसभेत हिमाचलमध्ये काँग्रेसला विजय मिळाला आणि यशवंतसिंह परमार राज्याचे मुख्यमंत्री झाले. १९६७ ते १९७२ आणि १९७२ ते १९७७ पर्यंत यशवंतसिंह परमार हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९९७ : पहिल्यांदा हिमाचलमध्ये बिगर काँग्रेस सरकार म्हणजे जनता पक्षाचे सरकार आले. १९७७ ते १९८२ पर्यंत जनता पक्षाच्या सरकारमध्ये शांता कुमार राज्याचे मुख्यमंत्री होते.
काँग्रेसला पुन्हा यश
१९८२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा एकदा जिंकली आणि यावेळी ठाकूर रामलाल राज्याचे मुख्यमंत्री झाले; पण मध्येच वीरभद्र सिंह यांना हटवून त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. १९८५ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा यश मिळाले आणि वीरभद्र सिंह राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते १९९० पर्यंत सत्तेत राहिले.
निवडणुकीतील चेहरा कोण?
भाजप सध्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा चेहरा समोर करून निवडणूक लढवणार आहे. मात्र, मोठा चेहरा पंतप्रधान मोदींचा आहे. जयराम ठाकूर यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश चंबेल सिंह कश्यप हेही पुढे आहेत. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये वीरभद्र सिंह यांचे निधन झाले आहे.
आळीपाळीने सरकार कधीपासून?
१९९०विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले व राज्यात प्रथमच भाजपचे सरकार स्थापन झाले. शांता कुमार राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून राज्यात आळीपाळीने भाजप व काँग्रेसची सत्ता आहे. २०१२मध्ये काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आली. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आला.
या निवडणुकीत नवे काय?
यावेळी ८० वर्षांवरील वृद्ध आणि कोरोनाग्रस्तांना घरबसल्या मतदानाची सुविधा दिली जाणार आहे. येथे ११८४ मतदारांचे वय १०० वर्षांपेक्षा जास्त आहे. मोफत योजनांच्या घोषणेवर निवडणूक आयोग यावेळी लक्ष ठेवणार आहे.
मुख्यमंत्री कोण होणार?
मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे भाजपकडून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हेही शर्यतीत आहेत. काँग्रेसकडून प्रतिभा सिंह, मुकेश अग्निहोत्री, कौलसिंह ठाकूर, सुखविंदर सिंग सुक्खू आघाडीवर आहेत.
राज्यातील निवडणुकीचे मुद्दे काय आहेत?
येथील पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. याशिवाय महागाई, बेरोजगारीचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. भाजपने विकासासोबतच सुरक्षा, सर्वसामान्यांना दिलासा, गरीब आणि शेतकरी मजबूत करण्याचा मुद्दा घेतला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"