आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने दिल्लीत लोकसभा जागा वाटपाची घोषणा केली. त्यानंतर पंजाबमध्ये सत्ताधारी आप व विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये तडजोड होणार नाही, अशी चर्चा सुरू होती. पंजाब काँग्रेसने पक्षाच्या निवडणूक आघाडी समितीला विनंती केली आहे की, भाजप-अकाली दल दोघांमध्ये युती झाली आहे की नाही, हे आधी पाहावे. लोकसभा निवडणुकीबाबत दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला, तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षानेही एकत्र निवडणुका लढवायला हव्यात. यामुळेच सध्या पंजाबमध्ये एकाही राजकीय पक्षाने लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही.
आघाडी समितीने काँग्रेस नेतृत्वाला असेही सांगितले आहे की, आधी आपण हे ठरवावे की, लोकसभेच्या विद्यमान खासदारांना तिकीट द्यायचे की नाही, कारण आघाडी झाल्यास काही जागा आम आदमी पक्षाकडे जाऊ शकतात. काँग्रेसच्या आघाडी समितीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू असताना पंजाब काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असे म्हटले होते. आम आदमी पक्ष राज्यात सत्तेत आहे आणि काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. अशा परिस्थितीत दोघांनी एकत्र निवडणूक लढविल्यास नुकसान होऊ शकते, असे पंजाब काँग्रेस शाखेचे म्हणणे आहे.