New Army Recruitment Policy : लष्कर, नौदल आणि हवाई दलात सैनिकांच्या भरतीसाठी भारत सरकारने मंगळवारी नवीन 'अग्निपथ योजना' जाहीर केली. या योजनेंतर्गत सैनिकांची भरती केवळ 4 वर्षांसाठी असेल, ज्याला 'अग्निवीर' म्हटले जाईल. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीत नवीन योजनेला मंजुरी दिल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याची घोषणा केली. यावेळी माध्यमांनी नोकरीतील प्रशिक्षण, अनुभव, पगार, निवड याबाबत अनेक प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांची लष्कराकडून उत्तरे देण्यात आली.
प्रशिक्षण कमी पडणार नाही? त्याचा काही परिणाम होणार नाही का?उत्तर- मूलभूत प्रशिक्षण 18 आठवड्यांचे असते, त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. अजूनही हीच प्रक्रिया फॉलो केली जाते. आम्ही फक्त त्याची वेळ कमी केली आहे. प्रशिक्षण वेळेवर आणि योग्य असावे हा यामागचा विचार आहे. प्रथम उमेदवारांना मूलभूत प्रशिक्षण दिले जाईल, नंतर व्यावसायिक कामासाठी 16 आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर 3 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा असेल.
यामुळे सैन्यात असलेल्यांच्या मनोबलावर परिणाम होणार नाही का?उत्तर- सैन्यात असलेल्या अधिकारी आणि सैनिकांच्या मनोबलावर काही परिणाम होणार नाही. सैन्यात युनिटनुसार बदल्या केल्या जातात. नौदलाच्या बाबतीत, जहाज किंवा युनिटमध्ये 2-3 वर्षांत बदली होते. एका जहाजावरुन दुसऱ्या जहाजावरही पाठवले जाते. सर्व पोस्टिंग वरिष्ठांसह कनिष्ठांसाठीही असते. आता यात अग्निवीरही असतील.
चीन-पाकिस्तान सीमेवर कमी प्रशिक्षण घेऊन कसे चालेल?उत्तर- प्रशिक्षण दिल्यानंतर अग्निवीरदेखील सध्याच्या सैनिकांप्रमाणेच आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असेल. लष्करातील प्रशिक्षणाचा दर्जा कठीण आहे. यंत्रणेच्या माध्यमातून सैनिकांवर सतत देखरेख ठेवली जाते. अग्निवीरच्या प्रशिक्षणात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ते पाकिस्तान किंवा चीन सीमेवर तैनात केले जातील. यामुळे आमची ऑपरेशनल क्षमता कमी होणार नाही.
स्थिर नोकरी आणि पेन्शन नाही, तरुणांना पर्याय काय?उत्तर- बारावीनंतर तीन पर्याय आहेत: उच्च अभ्यास, दुसरा कौशल्य विकास, तिसरी नोकरी. आम्ही तरुणांना तीनही संधी देत आहोत. चांगला पगार, चांगला बँक बॅलन्स, त्यांच्याकडे 4 वर्षांनंतर चांगले कौशल्य असेल. हे कौशल्य बाहेर उपयोगी पडेल, तसेच क्रेडिट पॉइंट्स दिले जातील, जे उच्च अभ्यासात उपयुक्त ठरतील. बाहेरील आव्हानांना हे उमेदवार सहज सामोरे जाऊ शकतील.