भारताच्या शेजारी असलेल्या बहुतांश सर्वच देशांमध्ये सध्या अशांतता आणि अंतर्गत संघर्ष सुरू आहेत. त्यातच भारताच्या ईशान्येकडील काही राज्यांना लागून असलेल्या म्यानमारमध्येही महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. येथील युनायटेड लीग ऑफ अराकान आणि त्यांची लष्करी संघटना असलेली अराकान आर्मी स्वातंत्र मिळवण्याच्या त्यांच्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. काही महिन्यांपूर्वी आराकान आर्मीसाठी स्वातंत्र्य मिळवून स्वतंत्र देश बनण्याचं स्वप्न हे खूप कठीण दिसत होतं. मात्र आता ते आपल्या लक्ष्याचा अगदी जवळ पोहोचल्याचं दिसत आहे.
या संघर्षामध्ये अराकान आर्मीने म्यानमार युनियनमधील रखाइन प्रांतामधील १८ पैकी १५ शहरांवर नियंत्रण मिळवलं आहे. मात्र तीन प्रमुख ठिकाणे ही अद्याप तरी म्यानमारच्या लष्करी सत्तेच्या ताब्यात आहे. त्यामध्ये बंगालच्या उपसागरामधील सित्तोय बंदराचा समावेश आहे. या बंदराच्या बांधणीसाठी कालाधान मल्टीमॉडेल प्रकल्पांतर्गत भारताने अर्थसहाय्य केले होते. दुसरं ठिकाण आहे चीनच्या मदतीने बांधण्यात आलेलं क्याउकफ्यू बंदर आणि मुआनांग शहर म्यानमारच्या लष्कराच्या ताब्यात आहेत.
२०२४ च्या अखेरच्या दिवशी अराकान आर्मीने ग्वा शहर आपल्या ताब्यात घेतले होते. मागच्या आठवड्यात बंडखोर अराकान आर्मीने अन शहरावर कब्जा केला होता. हे शहर पश्चिम मिलिट्री क्षेत्रीय कमांडचं मुख्यालय देखी आहे. त्यावरून या शहरांचं रणनीतिक महत्त्व दिसून येतं. काही दिवसांपूर्वीच अराकान आर्मीने माऊंगडॉ नगर लष्कराच्या ताब्यातून हिसकावून घेतले होते. त्याबरोबरच अराकान आर्मीचा बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवर पूर्णपणे कब्जा झाला होता.
आता बंडखोर पूर्ण रखाइन प्रांतावर कब्जा करून स्वातंत्र्याची घोषणा करण्यात यशस्वी झाले तर १९७१ मध्ये झालेल्या बंगालादेशच्या निर्मितीनंतर आशियामध्ये पहिलं यशस्वी फुटीरतावादी लष्करी अभियान असेल.