देहरादूनअयोध्येतील भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील फक्त हिंदू कुटुंबांकडेच वर्गणी मागण्यासाठी जातील, असं विधान विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी केलं आहे.
१५ जानेवारीपासून विश्व हिंदू परिषदेकडून श्री राम जन्मभूमी मंदीर निधी समर्पण अभियान सुरू करण्यात येणार आहे. उत्तराखंडमधील २४ लाख कुटुंबांतील जवळपास १ कोटी श्री राम भक्तांना राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी आणि त्यांचा वेळ देण्याचं आवाहन 'विहिंप'कडून करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात २७ फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. पण उत्तराखंडमध्ये राज्याचा आकार लक्षात घेता ५ फेब्रुवारीपर्यंतच मोहीम राबविण्यात येणार आहे.
राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्वसामान्य जनतेचंही योगदान लाभावं यासाठी देशातील नागरिकांकडून निधी जमा करण्यात येणार असल्याचं विहिंपने जाहीर केलं होतं. त्यानंतर या मोहीमेत सर्वधर्मियांकडून निधी घेतला जाणार आहे का? या प्रश्नावर विहिंपचे प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
"श्री राम मंदिराबाबतचा इतिहास लक्षात घेता आम्ही फक्त हिंदू कुटुंबियांशीच संपर्क साधणार आहोत.", असं तिवारी म्हणाले. इतर धर्मियांबाबत पुन्हा एकदा विचारलं असता त्यांनी पुन्हा एकदा आम्ही फक्त राम भक्तांशीच संपर्क साधणार आहोत, असं ते म्हणाले.
"विहिंपचे कार्यकर्ते सर्व ठिकाणी फिरतील पण इतर धर्मियांच्या घरी ते जाणार नाहीत. मात्र, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि इतर बांधवांनी जर स्वत:हून आमच्याशी संपर्क साधून निधी देण्याची इच्छा व्यक्त केली. तर त्यांच्या निधीचा आम्ही सन्मानाने स्वीकार करू", असंही तिवारी म्हणाले.