नवी दिल्ली : राजस्थानचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, याबाबतचा तिढा सुटला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गहलोतच पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत. तर उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड करण्यात आली आहे.
राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेले अशोक गहलोत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या दोघांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. यावर काँग्रेस पक्षाकडून तोडगा काढण्यात आला असून अशोक गहलोत यांच्याकडे पुन्हा एकदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तर सचिन पायलट यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राजस्थानातील निरीक्षक के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
यावेळी अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी व नवनिर्वाचित आमदारांचे आभार मानताना, जी आश्वासनं आम्ही जनतेला दिली ती पूर्ण करण्यासाठी आम्ही झटणार आहोत. सुशासन आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी हे मुद्दे आमच्या अजेंड्यावर सर्वोच्च स्थानी असतील, असे सांगितले. दरम्यान, अशोक गहलोत हे राजस्थानातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी दोनदा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात.
याचबरोबर, आम्ही याच खोलीत दोघेही बसलो होतो आणि दोघेही करोडपती झालो आहोत, असे सांगत सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच, राजस्थानच्या जनतेचे आभार मानले.
दरम्यान, गेल्या 11 डिसेंबरला झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचा काँग्रेसने पराभव केला.