नवी दिल्ली : शीख समाजाची आणि मुख्यत्वे सरदारजींची विनोदांद्वारे खिल्ली उडविणाऱ्यावर लवकरच निर्बंध घातले जाण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. इंटरनेटवर वांशिक आणि सांप्रदायिक विनोद पसरविण्यावर निर्बंध घालण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सरदारजींवरील विनोदांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सांगितले. वेबसाईट्सवर शीख समाजाच्या लोकांना मूर्ख सिद्ध करणाऱ्या विनोदांच्या प्रसारणांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीला या संदर्भात काही उपाय सुचविण्यास सांगितले. इंटरनेटच्या माध्यमातून प्रसारित केल्या जाणाऱ्या वांशिक आणि सांप्रदायिक विनोदांवर बंदी घालण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्याच्या मागणीवर विचार केला जाईल, असे पीठाने स्पष्ट केले.अशा विनोदांवर बंदी घालण्यासाठी सहा आठवड्यांच्या आत काही उपाय सुचवा, असे या पीठाने याचिकाकर्ते हरविंदर चौधरी आणि दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीला सांगितले. विद्यार्थ्यांनाही एखादा समाज वा राज्यावर आधारित असलेले विनोद प्रसारित करण्यापासून रोखण्यात आले पाहिजे, असे समितीने म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सरदारजींवरील विनोदांवर बंदी येणार?
By admin | Published: February 17, 2016 2:51 AM