नवी दिल्ली : महाराष्ट्रात पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यती सुरू करण्यातील अडथळे आता दूर झाले आहेत. त्यासंबंधी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे.तामिळनाडूमध्ये बैलांचा जलिकट्टु हा खेळ आणि महाराष्ट्रातील बैलगाड्यांच्या शर्यती यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. पशुप्रेमी संघटनांनी या खेळांवर बंदी घालावी, अशी मागणी केली होती.पशुंना या खेळांमध्ये क्रूर वागणूक दिली जाते, असा त्या संघटनांचा आक्षेप होता. दुसरीकडे बैलगाड्यांच्या शर्यतीत कोणतेही क्रौर्य नाही आणि हा आमचा पारंपरिक खेळ आहे, असे या शर्यती आयोजित करणाºयांचे म्हणणे होते.मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर जलिकट्टू खेळाला परवानगी देण्यासाठी तामिळनाडू विधानसभेने विधेयक मंजूर केले होते. त्याच पद्धतीने महाराष्ट्र विधानसभेने बैलगाडा शर्यती विधेयक संमत केले होते. ते संमत झाल्यावर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेले होते. राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली आहे.राज्यात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करता याव्यात, यासाठी विधानसभेत पशु क्रुरता प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मांडले होते. ते मंजूर होऊ नही त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी नसल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले नव्हते. ती स्वाक्षरी झाली असल्याची माहिती बुधवारी देण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, विशेषत: पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा होणार बैलगाड्यांच्या शर्यती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 3:57 AM