नवी दिल्ली - BJP Candidate list for LS ( Marathi News ) भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत १२५ लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीतील नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीसह केंद्रीय निवडणूक समितीचे सर्व सदस्य या बैठकीला हजर राहतील. सूत्रांनुसार, आजच्या बैठकीनंतर भाजपालोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करेल.
भाजपाच्या या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे नाव असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अनेक केंद्रीय मंत्रीही यादीत दिसतील जे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. या यादीत ३ प्रकारच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते. ज्यात एक व्हिआयपी जागा, दुसरे राज्यसभेतील काही नावे ज्यांना लोकसभेत उतरवलं जाऊ शकते. तर तिसरे ज्या जागांवर भाजपाची ताकद कमी आहे तिथेही उमेदवार घोषित केला जाऊ शकतो.
बुधवारी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ६ राज्यांच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक राज्यातील उमेदवार आणि कोअर कमिटीचे मत याचा आढावा घेण्यात आला. आज संध्याकाळी यूपीच्या कोअर कमिटीचीही बैठक होईल. लोकसभा निवडणुकीसाठी काही जागांवरील उमेदवारांच्या नावावर चर्चा होईल. परंतु आज केंद्रीय भाजपाच्या निवडणूक समितीच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपाची पहिली यादी जाहीर झाली तर त्यात कुणाला संधी मिळेल याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील २३ जागांसाठी भाजपानं निरिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यात आमदार, मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. निरिक्षकांमध्ये भाजपानं पंकजा मुंडे यांनाही उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिलीय. ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर उत्तर पूर्व मुंबईची जबाबदारी आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बीडची जबाबदारी दिलीय. मुंबई उत्तर मध्य जागेसाठी धनंजय महाडिक यांना संधी दिली आहे. मागील निवडणुकीत भाजपानं २५ जागा लढवल्या होत्या. त्यातील २३ जागांवर विजय मिळवला तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळवला होता.