बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार? ; काँग्रेसचीही जोरदार मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 11:49 AM2024-03-06T11:49:20+5:302024-03-06T11:50:02+5:30

मराठा एकीकरण समितीच्या भूमिकेकडेही लक्ष

Will BJP candidate change in Belgaum Lok Sabha Constituency, Congress is also building a strong front | बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार? ; काँग्रेसचीही जोरदार मोर्चेबांधणी

बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार? ; काँग्रेसचीही जोरदार मोर्चेबांधणी

प्रकाश बिळगोजी

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर राजकीय हालचालींना वेग आला भाजप विद्यमान खासदार मंगला अंगडी यांनाच उमेदवारी देणार की नवा चेहरा देणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसनेही भाजपच्या ताब्यातील बेळगावचा गड काबीज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भूमिकेकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.

मागील चारही निवडणुकीत दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या माध्यमातून भाजपचा बेळगाव लोकसभा मतदार संघावर वरचष्मा राहिला आहे. सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मंगला अंगडी यांना उमेदवारी देण्यात आली आणि पोटनिवडणुकीत देखील भाजपनेच मुसंडी मारली. सध्या होऊ घातलेल्या निवडणुकीत कै. सुरेश अंगडी यांची कन्या आणि माजी मुख्यमंत्री तसेच सुरेश अंगडी यांचे व्याही जगदीश शेट्टर यांची स्नुषा श्रद्धा अंगडी-शेट्टर यांना उमेदवारी देण्यासंदर्भात देखील हालचाली सुरू असल्याचे समजते.

श्रद्धा अंगडी यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अंगडी कुटुंबीयांसोबतच राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या जारकीहोळी कुटुंबातील अरभावी मतदार संघाचे आमदार भालचंद्र जारकीहोळी, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांचीही नावे चर्चेत असून या चार इच्छुकांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

नड्डा यांच्या दौऱ्यानंतर ठरणार उमेदवार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे दोन दिवस बेळगाव दौऱ्यावर असून यादरम्यान ते भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्यादरम्यान भाजपच्या उमेदवाराचे नाव निश्चित होऊ शकेल, अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

काँग्रेसची जोरदार तयारी

दुसऱ्या बाजूला राज्यात सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसकडूनही बेळगाव लोकसभा मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार, महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी ही जोडगोळी बेळगाव लोकसभा मतदार संघ काबीज करण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागल्याचे चित्र आहे.

काँग्रेसकडून तीन नावे चर्चेत

१९९९ साली बेळगाव लोकसभा मतदार संघ काँग्रेसकडे होता. अमरसिंह पाटील यांनी भाजपच्या बाबागौडा पाटील यांचा तब्बल ५०,००० मतांनी पराभव करत बेळगाव लोकसभा मतदार संघावर बाजी मारली होतील. त्यानंतर मात्र काँग्रेसला बेळगाव लोकसभा मतदार संघ काबीज करता आला नाही. काँग्रेसमध्ये उमेदवारीसंदर्भात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर, डॉ. व्ही. एस. साधुण्णवर आणि माजी खासदार अमरसिंह पाटील यांची नावे चर्चेत आहे.

काँग्रेसची भिस्त हमी योजनांवर

राज्यात देण्यात येत असलेल्या हमी योजनांच्या जोरावर तसेच हेब्बाळकर आणि जारकीहोळी यांच्या जिल्ह्यावर असलेल्या वरचष्म्यामुळे बेळगाव लोकसभा मतदार संघाची विजयश्री काँग्रेसला खेचून आणता येईल का? याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे.

मराठा मतपेटी निर्णायक

दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी मतांची टक्केवारी आणि मराठी मतदारांच्या संख्येचे शक्तिप्रदर्शन घडविण्यासाठी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला होता. या निवडणुकीत समितीचीही मतपेटी महत्त्वाची ठरत आली आहे. विजयी उमेदवार ठरविण्यात मराठा मतदार निर्णायक भूमिका बजावू शकतात. सीमाभागातील मराठी मतदारांचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनेही आगामी लोकसभा निवडणूक लढवावी, असा मतप्रवाह असल्याने समितीच्या कार्यकर्त्यांकडून समितीने उमेदवार उभा करावा या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे. यामुळे समिती काय निर्णय घेते याकडेही लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Will BJP candidate change in Belgaum Lok Sabha Constituency, Congress is also building a strong front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.