नवी दिल्ली : शिवसेनेपाठोपाठ अकाली दलानेही भाजपच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संयुक्त जनता दल भाजपचा सर्वात मोठा सहकारी पक्ष म्हणून समोर आला. मात्र आपल्याहून कमी जागा जिंकणाऱ्या नीतिशकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची भूमिका भाजपने कायम ठेवली, तरच रालोआचे अस्तित्त्व टिकेल.
२०१४ साली लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात शिवसेना व भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली. पण नंतर शिवसेना-भाजप युती सरकार झाले. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत युती कायम राहिली. मात्र मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर गेले. जदयूनेही पंतप्रधान मोदी यांना विरोध करून रालोआला काही काळ सोडचिठ्ठी दिली होती.
अकाली दलाने कृषी विधेयकावरून भाजपला विरोध करताच रालोआचे अस्तित्त्व डळमळले. आता बिहारमध्ये नितीशना मुख्यमंत्री न केल्यास रालोआच्या हाही मित्र दूर जाईल. नितीश आता ते पद स्वीकारणार का, हाही प्रश्न आहे. राज्य भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रीपदी नीतिशच राहतील, असे सांगून ही संदीग्धता कमी करण्याचा प्रयत्न चालविला आहे.