चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर उभारू; अमित शहांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 03:28 PM2019-12-16T15:28:08+5:302019-12-16T15:30:17+5:30
झारखंड विधानसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा
रांची: येत्या चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी मंदिर उभारू, अशी मोठी घोषणा भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी केली आहे. झारखंड विधानसभेच्या प्रचारासाठी पाकुडमध्ये आयोजित जनसभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी पुढील चार महिन्यांत अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचं म्हटलं.
अयोध्येत रामाचं मंदिर उभारण्यात यावं, ही भारतीयांची कित्येक दशकांपासूनची मागणी असल्याचं अमित शहा म्हणाले. 'काही दिवसांपूर्वीच अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. अयोध्येत प्रभू रामाचं भव्यदिव्य मंदिर उभारलं जावं ही १०० वर्षांपासून जगभरातल्या भारतीयांची भावना होती. राम मंदिरांची उभारणी व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र काँग्रेस आणि त्यांच्या वकिलांनी यामध्ये अडथळे आणले,' अशा शब्दांत अमित शहा काँग्रेसवर बरसले. या प्रकरणात खटला चालवू नका, असं काँग्रेसचे नेते आणि वकील कपिल सिब्बल न्यायालयाला सांगत होते. त्यांच्या पोटात नेमकं का दुखत होतं, असा सवाल शहांनी उपस्थित केला.
मैं आपसे कहना चाहता हूं कि सुप्रीम कोर्ट का फैसला आ गया है, 4 माह के अंदर आसमान को छूता हुआ भव्य राम मंदिर अयोध्या में बनने जा रहा है: श्री @AmitShah#HarVoteModiKo
— BJP (@BJP4India) December 16, 2019
काँग्रेसवर जोरदार टीका करताना अमित शहांनी अयोध्येत राम मंदिराची उभारणी केव्हा होणार, यावरही भाष्य केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. आता पुढील ४ महिन्यांमध्ये अयोध्येत प्रभू रामाचं गगनचुंबी मंदिर उभारू, अशी घोषणा शहांनी केली. झारखंडमधील सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल केला. काँग्रेस ना विकास देशाचा करू शकते, ना देशाला सुरक्षित ठेवू शकते. त्यांना जनभावनादेखील समजत नाही, अशा शब्दांत अमित शहांनी काँग्रेसचा समाचार घेतला.