- हरीश गुप्तानवी दिल्ली : ‘कनिका’ व्हायरसमुळे निर्माण झालेल्या नव्या पेचामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे. संसदेचे अधिवेशन ३ एप्रिल रोजी समाप्त होणार होते. मात्र, आगामी काही दिवसात अधिवेशन समाप्त केले जाऊ शकते. वित्त विधेयक सोमवारीच आणून त्याच दिवशी मंजूर करण्याचे सरकारने स्पष्ट करत याचे संकेतही दिले आहेत.वित्त विधेयक मार्चच्या अखेरच्या आठवड्यात आणण्यात येणार होते. मात्र, गायिका कनिका कपूरच्या लखनौतील पार्टीत भाजपचे खासदार दुष्यंत सिंह यांनी हजेरी लावल्याचे समोर आल्यानंतर अशी शक्यता व्यक्त होत आहे की, मोठ्या संख्येने खासदार संक्रमित असू शकतात. कारण, दुष्यंत सिंह हे १७ मार्चच्या पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला हजर होते. यावेळी त्यांनी अनेक खासदारांची भेट घेतली. १८ मार्च रोजी राष्ट्रपती भवनातील एका कार्यक्रमासही त्यांनी हजेरी लावली.भाजपचे नेतृत्वच सध्या पेचात सापडले आहे. कारण, लोकसभेतील दहा खासदारांनी कामकाजापासून अलिप्त राहण्याची परवानगी मागितली आहे. जर, एखादा खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला तर ही संख्या वाढू शकते. मात्र, सरकार कोणतीही जोखिम घेऊ इच्छित नाही आणि जनता कर्फ्यूच्या माध्यमातून संपूर्ण लॉक डाउन होईपर्यंत कामकाज चालविण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशन सुरुच ठेवले तर आमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे अनेक खासदारांनी भाजप नेतृत्वाला सांगितले आहे.भाजप नेतृत्व पेचात?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार सोमवारी वित्त विधेयक आणणार असून पक्षाच्या सर्व खासदारांनी हजर राहण्याचा व्हिप भाजपने काढला आहे. एका कॅबिनेट मंत्र्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, गायिकेच्या पार्टीत खासदार हजर राहिल्याने कोरोना संसर्ग अनेकांना झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळेच वित्त विधेयक सोमवारी आणून अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा विचार सुरु आहे.
संसदेचे अधिवेशन गुंडाळणार?; वित्त विधेयक सोमवारीच, ‘कनिका’पार्टीनंतर सरकार सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 5:01 AM