Independence Day 2024: नवी दिल्ली : भारताचा आज ७८ वा स्वातंत्र्यदिन संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केलं. यावेळी पुढील ५ वर्षात वैद्यकीय क्षेत्रात देशात ७५ हजार जागा नवीन निर्माण केल्या जाणार आहेत, असे नरेंद्र मोदींनी सांगितलं.
सध्या देशभरात एमबीबीएसच्या १ लाखांहून अधिक जागा आहेत. देशात एकूण वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ७०४ आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण केले. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी कुठे-कुठे जातात. याचा विचार केला तर हैराण व्हायला होते. दरवर्षी २५ लाख भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण शिकण्यासाठी विदेशात जातात.
वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढल्यानंतर विद्यार्थ्यांना भारतातच चांगलं शिक्षण घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात जावे लागणार नाही. त्यामुळे गेल्या १० वर्षात आम्ही मेडिकलच्या जागा वाढवून त्या १ लाख केल्या आहे. येत्या पाच वर्षात मेडिकल क्षेत्रात ७५ हजार नव्या जागा तयार केल्या जातील, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
दरम्यान, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या एकूण ५५,६४८ तर खासगी महाविद्यालयात एमबीबीएसच्या ५०,६८५ जागा आहेत. या जागांवर यावेळी प्रवेश घेतला जात आहे. नीट यूजी २०२४ काउंसलिंग राउंड १ साठी नोंदणी प्रक्रिया १४ ऑगस्टपासून सुरू होत आहे, जी २० ऑगस्टपर्यंत असणार आहे. पहिल्या फेरीतील जागावाटपाचा निकाल २३ ऑगस्टला जाहीर होणार आहे. नीट यूजी काउंसलिंग एकूण चार राउंडमध्ये केले जाईल.