नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केलेले बालाकोटमधील दहशतवादी तळ पाकिस्ताननं पुन्हा सक्रीय केले आहेत. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर फार काळ लपाछपीचा खेळ चालणार नाही. गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा गर्भित इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला दिला आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिला.फेब्रुवारीमध्ये भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक करत बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र अवघ्या सात महिन्यांमध्ये पुन्हा एकदा बालाकोटमध्ये दहशतवादी सक्रीय झाले आहेत. या भागातून २५० ते ५०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकनं नेमकं काय हाती लागलं, असा प्रश्न रावत यांना विचारण्यात आला. त्यावर जोपर्यंत सीमेपलीकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात नाही, तोपर्यंत नियंत्रण रेषा ओलांडणार नसल्याचं उत्तर रावत यांनी दिलं. 'पाकिस्तानकडून दहशतवादी नियंत्रित केले जातात. पाकिस्तानच्याच इशाऱ्यावरुन दहशतवादी कारवाया होतात. मात्र हा लपंडाव फार काळ चालणार नाही. गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू. जमिनीवरुन किंवा हवाई मार्गानं नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करण्यास आम्ही कचरणार नाही,' असा स्पष्ट इशारा रावत यांना पाकिस्तानला दिला. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालत नाही, हा पाकिस्तानचा दावा असतो. मात्र पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद्यांची शिबिरं भरतात, हे सत्य आहे. दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताविरोधात छुपं युद्ध लढायचं हे पाकिस्तानचं कारस्थान आहे, असंदेखील रावत म्हणाले.
गरज पडल्यास नियंत्रण रेषादेखील ओलांडू; लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 10:05 AM