Delhi CM Rekha Gupta News:दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहलवरून भाजपानेदिल्ली विधानसभा निवडणूक चांगलीच गाजवली होती. आम आदमी पक्षाचे सरकार असताना झालेला भ्रष्टाचार, गैरव्यवहार, यमुना नदीची स्वच्छता यासह शीशमहल हा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी होता. भाजपाचा मुख्यमंत्री त्या शीशमहलमध्ये राहायला जाणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले होते. आता त्या शीशमहलचे नेमके काय केले जाणार? दिल्लीतील नव्या भाजपा सरकारचा प्लान काय? याबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सविस्तर माहिती दिली.
अलीकडेच एका माहितीच्या अधिकारातून शीशमहल संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी ५२ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर आता एका माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीला उत्तर देताना दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनंतर भाजपाने पुन्हा एकदा आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल यांच्या फ्लॅगस्टाफ रोड बंगल्यात ३१ मार्च २०१५ ते २७ डिसेंबर २०२२ दरम्यान दुरुस्तीसह विविध प्रकारच्या देखभालीवर २९.५६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. याचा अर्थ असा की दरवर्षी सरासरी ३.६९ कोटी रुपये केवळ देखभालीवर खर्च केले जात होते, असा दावा भाजपाने केला आहे. यातच आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शीशमहलबाबत मोठे विधान केले आहे.
दिल्लीतील भाजपा सरकार शीशमहल विकणार?
त्या मालमत्तेचा वापर सार्वजनिक हितासाठी केला जाण्याचा विचार सुरू आहे. जनतेतूनच आम्हाला अनेक पर्याय यासाठी मिळत आहेत. उदारहणच द्यायचे झाले तर, दिल्लीचे स्वतःचे कोणतेही राज्य अतिथीगृह नाही, म्हणून त्या ठिकाणी राज्य अतिथीगृह बनवले पाहिजे. मनात असाही विचार आहे की, त्याचा लिलाव करावा आणि जे काही पैसे मिळतील ते सरकारी तिजोरीत परत जमा करावेत. आम्हाला असेही वाटते की, ते जनतेसाठी खुले केले पाहिजे. जेणेकरून लोकांनी येऊन ते पाहिले पाहिजे. काहीही शक्य आहे. आम्ही पर्यायांचा विचार करत आहोत, असे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत त्या बोलत होत्या.
दरम्यान, शीशमहल राहण्यायोग्य नाही, तिथे राहायला जावे, असे अजिबात वाटत नाही. तो शीशमहल जनतेच्या पैशांचा दुरुपयोग करून बांधला गेला आहे. त्या घरात राहणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केले. रेखा गुप्ता सद्यस्थितीत शालीमार बागेतील त्यांच्या जुन्या घरात राहत असून, तेथूनच त्यांचे कार्यालय चालवत आहेत. याबाबत बोलताना रेखा गुप्ता यांनी सांगितले की, ते घर लहान आहे. त्या ठिकाणी लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत आम्ही रस्त्यावर टेबल आणि खुर्च्या मांडतो. सरकारी घर मिळेल तेव्हा मिळेल, तोपर्यंत त्या घरातूनच काम करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.