नवी दिल्ली : प्रधानमंत्री स्कूल्स फॉॅर रायझिंग इंडिया (पीएम-श्री) योजनेच्या अंतर्गत देशातील १४,५०० शाळांचा विकास केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त सोमवारी केली.
ते म्हणाले की, या शाळा नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील तत्त्वांना साजेशा असणार आहेत. तिथे आधुनिक तंत्रज्ञानविषयक सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील. विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने शिकविण्याचे काम या शाळांतून होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांतील शोधक वृत्तीला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे काम या १४,५०० शाळांनी करावे. त्याचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा होईल, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. मोदी म्हणाले की, शाळा, वर्ग व घरामध्ये घडणाऱ्या गोष्टींतील विसंगती लक्षात आल्यानंतर मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नीट मार्गदर्शन केले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी एकरूप व्हावे, असेही मोदी यांनी सांगितले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे मार्गदर्शकशिक्षकांनी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा नेहमी वाचला पाहिजे. विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकांना जे प्रश्न पडतात, त्याची उत्तरे शोधण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण मार्गदर्शक ठरेल. विद्यार्थ्यांनीही नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयी चर्चा केली पाहिजे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.