नवी दिल्ली - विश्वचषक स्पर्धेतून भारत बाहेर पडल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या भाजपा प्रवेशाची चर्चा रंगली होती. धोनी लवकरच निवृत्ती घेऊन भाजपात येणार असल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री संजय पावसान यांनी केला होता. याबाबत धोनीशी अनेकदा चर्चा झाली असल्याचंही त्यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितलं. त्यानंतर, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी. नड्डा यांना धोनीच्या प्रवेशाबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
धोनीच्या भाजपा प्रवेशाबाबत संजय पासवान यांनी धोनीचे स्वागत असून तो लवकरच भाजपात सामिल होईल, असे म्हटले होते. विशेष म्हणजे पक्षाच्या संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीही धोनीची भेट घेतली होती. तर, टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज गौतम गंभीरनेही भाजपात अधिकृत प्रवेश करुन दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे गौतम गंभीर आज भाजपाकडून खासदारही आहे.
भाजपा नेते जेपी नड्डा यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झारखंडचा दौरा केला. यावेळी, धोनीच्या प्रवेशाबाबत नड्डा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, धोनी भाजपात येत असेल तर त्याचे स्वागत आहे, असे नड्डा यांनी म्हटले. भाजपाकडून सदस्यता नोंदणी सुरू आहे. त्यामुळे धोनी भाजपात येत असेल तर आम्हाला आनंदच होईल, असेही नड्डा यांनी म्हटले. नड्डा हे रांची येथे भाजपा नेत्यांना कानमंत्र देण्यासाठी पोहोचल आहेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी पक्षाकडून मिशन 65+ ठेवण्यात आले आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या 82 जागांसाठी निवडणुका होत आहेत. सध्या भाजपाने भाजपाकडे 37 जागा आहेत. दरम्यान, धोनी सध्या भारतीय संघात खेळत असून विश्वचषकात त्याने महत्त्वाची भूमिका निभावली. मात्र, भाजपा प्रवेशाबाबत धोनीने कुठलेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.