नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या. दरम्यान, एकनाथ खडसे अजूनही भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
गुरुवारी रात्री एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ खडसे भाजपमधे प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे आणि अमित शाह यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. भाजपमध्ये एकनाथ खडसे यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा देखील सुरु आहे.
दरम्यान, भाजपवर नाराज झालेल्या एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. याबाबत काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी स्वतः कबुली दिली होती. पण अद्याप त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही. फक्त प्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत. आता त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त कधी लागतो, याकडे त्यांच्या समर्थकांचे, हितचिंतकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल भाष्य केले होते. "नाथाभाऊ मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील. तसेच, योग्यवेळी नाथाभाऊंचा भाजपमध्ये प्रवेश होईल", असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता.