अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने एक पत्रक काढून सांगितले की देशातील आर्थिक मंदी घालवण्यासाठी तसेच कारखानदारी टिकवून ठेवण्यासाठी आजचे आर्थिक धोरण चालणार नाही. यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व नरसिंह राव या काँग्रेस नेत्यांनी जे निर्णय घेतले ते निर्णय घेण्याची आज गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे खुद्द अर्थमंत्र्याचे पतीच जर असे सांगतात तर सरकार यावर गंभीरपणे विचार करणार का? यासोबतच अर्थमंत्री हा सल्ला ऐकणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. अकलूजमध्ये माळशिरसमधील प्रचारसभेत शरद पवार बोलत होते.
सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. तसेच देशाची अर्थव्यवस्था संकटात असून त्यामधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सरकारकडे नाही. त्यामुळे ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं लवकरात लवकर आवश्यक पावलं उचलायला हवीत, असं प्रभाकर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या एका लेखात म्हटलं होतं.
प्रभाकर हैदराबादमधील राईट फोलियो नावाच्या खासगी कंपनीत व्यवस्थापकीय संचालक आहेत. 'भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. मात्र हे वास्तव मान्य करण्याची सरकारची तयारी नाही. परंतु समोर येणाऱ्या आकडेवारीतून अर्थव्यवस्थेसमोरील संकट दिसून येत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे,' असं प्रभाकर यांनी लिहिलं आहे. घटलेला जीडीपी आणि त्यामुळे गेलेल्या नोकऱ्या याची आकडेवारीदेखील त्यांनी लेखात दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर ५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या ६ वर्षांमधील हा निच्चांक आहे. तर बेरोजगारीच्या दरानं गेल्या ४५ वर्षांमधील उच्चांक गाठला आहे, असल्याचे प्रभाकर यांनी सांगितले आहे.