नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले समृद्ध आणि सर्वसमावेशक भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आणि १२५ व्या जयंती वर्षानिमित्त १२५ रुपये आणि १० रुपयांचे स्मृती नाणे जारी करताना ते बोलत होते.डॉ. आंबेडकर हे दूरदृष्टी असलेले विचारवंत होते. सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली गेली. मात्र, त्यांचे आर्थिक विचार आणि दृष्टिकोन पूर्णपणे समजून घेण्यात आला नाही. त्यांचा हा विचारही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यांनी समावेशकता आणि सलोख्याबाबत मांडलेले विचार आपल्याला प्रेरणा देत राहतील, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला अर्थमंत्री अरुण जेटली तसेच सामाजिक न्याय आणि अधिकारमंत्री थावरचंद गहलोत उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)आंबेडकरांना अपमान आणि अवहेलना सोसावी लागली; पण त्यांच्या कार्यातून देशभक्तीचाच प्रत्यय आला. काही लोकांनी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून का साजरा करताय? असा प्रश्न विचारला. बाबासाहेबांना ज्यांनी समजून घेतले ते असे प्रश्न विचारणार नाहीत, असे मला वाटते. आंबेडकर आणि राज्यघटनेवर नेहमी चर्चा व्हायला हवी. संविधान दिन साजरा करणे हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.बाबासाहेबांसारख्या थोर नेत्यांमुळेच आपण प्रगतीची नवी उंची गाठू शकलो. नाण्यांवर आंबेडकरांची प्रतिमा आणली जाईल, असा दिवस येईल, असा कुणी विचारही केला नसेल, असे उद्गार मोदींनी नाणी जारी केल्यानंतर काढले. त्यांनी संसदेतील हिरवळीवर डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करू -मोदी
By admin | Published: December 06, 2015 11:05 PM