नवी दिल्ली : शेतमालाला दीडपट भाव, लोकायुक्तांची नियुक्ती यांच्यासह अनेक मागण्यांसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलनास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केंद्रीय मंत्र्यांसोबत भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीनंतर सरकारचा प्रस्ताव अण्णांना मान्य होणार आहे का? याबाबत चर्चा सुरु आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास गिरीश महाजन केंद्रीय मंत्र्यांसोबत अण्णा हजारेंची भेट घेणार आहे. दरम्यान, मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय भेटायला येऊ नका, मी त्याशिवाय कुणाशीही चर्चा करणार नाही, असा स्पष्ट संदेश अण्णांनी गिरीश महाजन यांना पाठविला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांना रविवारी दिल्लीतच ताटकळत थांबावे लागले. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने अण्णांची मनधरणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सोपविली आहे. दिल्लीतून भाजपाचा एकही नेता अण्णांशी चर्चा करणार नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना अण्णांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला पाठविल्याचे समजते. दरम्यान, अण्णांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. त्यामुळे अण्णांची प्रकृती सातत्याने ढासळत असल्याने, केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे.
प्रकृतीची धास्ती!मागच्या आंदोलनांच्या तुलनेत यंदा अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला असला, तरी अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची भाजपाने धास्ती घेतली आहे. अण्णांची प्रकृती अजून ढासळल्यास, भाजपाला त्याचा फटका बसू शकतो. अण्णांना लोकांचे समर्थन मिळू शकते.