दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) आज गुजरात दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सौराष्ट्र क्षेत्राती राजकोटमध्ये वेरावल येथे एका जनसभेला केजरीवाल संबोधित करणार आहेत. गुजरातच्या जनतेसमोर केजरीवाल दुसरं मोठं आश्वासन देणार आहेत. केजरीवालांचं आजची मोठी घोषणा रोजगारासंदर्भात असणार आहे. केजरीवाल यांनी निवडणुकीचं संपूर्ण लक्ष्य रोजगाराच्या मुद्द्यावर केंद्रीत केलं आहे. केजरीवाल यांनी यावेळी गुजरातमध्ये विषारी दारुमुळे घडलेल्या दुर्गटनेचाही मुद्दा उपस्थित केला.
"आज मला सोमनाथांच्या पवित्र धरतीवर येण्याचं भाग्य प्राप्त झालं. गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. विषारी दारु प्यायलामुळे ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी दोन मिनिटांचं मौन व्रत आपण पाळलं. ज्यादिवशी हा प्रसंग घडला त्यादिवशी पीडितांना भेटण्यासाठी मी रुग्णालयात गेलो होतो. ते अत्यंत गरीब आहेत आणि मला कळालं की अजूनही राज्याचे मुख्यमंत्री काही त्यांना भेटायला पोहोचलेले नाहीत", असं केजरीवाल म्हणाले.
भाजपाच्या एका नेत्यानं यावर टिप्पणी करताना केजरीवालांच्या या कृतीतून मतांवर कोणताही परिणाम होणार नाही असं म्हटलं. केजरीवालांनी याही विधानाचा समाचार घेतला. "प्रत्येक काम काही मत मिळवण्यासाठी केलं जात नसतं. जर दिल्लीचा मुख्यमंत्री इथं गुजरातमधील दुर्गटनेच्या पीडितांना भेटण्यासाठी येऊ शकतो. पण गुजराजचे मुख्यमंत्री का येऊ शकले नाहीत?, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. तसंच यावेळी लोकांनी संबंधित परिसात खुलेआम दारुविक्री होत असल्याची तक्रार देखील केली. इतकंच नव्हे, तर दारुची होम डिलिव्हरी होत असल्याचाही दावा केला.
५ वर्षात प्रत्येक बेरोजगाराला मिळणार रोजगार"आज मी तुम्हाला रोजगाराची हमी देतो. प्रत्येक बेरोजगाराला ५ वर्षात रोजगार मिळेल. तुम्ही म्हणाल की हे कसं होऊ शकतं? मी दिल्लीतून आलो आहे आणि दिल्लीत 12 लाख मुलांना रोजगार दिला आहे. सध्या माझ्या मंत्र्यांसोबत बसून येत्या ५ वर्षांत दिल्लीत २० लाख रोजगार निर्माण करण्याचं वचन दिलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जोवर रोजगार मिळत नाही जोवर बेरोजगारांना दरमहा ३ हजार रुपये बेरोजगारी भत्ता आम्ही देऊ. तिसरं म्हणजे 10 लाख सरकारी नोकऱ्या निर्माण केल्या जातील. त्याचबरोबर पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणून माफियांना शिक्षा होईल. सहकार क्षेत्रात नेत्यांच्या शिफारशीशिवाय नोकऱ्या देऊ. तसेच, मी माझ्या बंधू-भगिनींना आवाहन करेन की, फक्त काही महिने बाकी आहेत, कोणीही आत्महत्या करू नये", असंही केजरीवाल म्हणाले.