हरीश गुप्ता - नवी दिल्लीकेरळचे राज्यपाल न्या. पी. सदाशिवम यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश असलेले सदाशिवम हे दिल्लीत परतण्यास आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी)अध्यक्षपद भूषविण्यास इच्छुक असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी म्हटले आहे.एनएचआरसीचे विद्यमान अध्यक्ष न्या. के. जी. बालकृष्णन हे लवकरच निवृत्त होणार असल्याने त्यांचा उचित उत्तराधिकारी शोधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. एनएचआरसी कायद्यानुसार निवृत्त सरन्यायाधीशच आयोगाचा अध्यक्ष बनू शकतो. देशात निवृत्त सरन्यायाधीश मोजकेच आहेत आणि त्यातही फार कमी निवृत्त सरन्यायाधीश हे एनएचआरसीचे अध्यक्ष बनण्यास राजी आहेत.मोदी सरकारपुढे अनेक पर्याय नाहीत. निवृत्त सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांना एनएचआरसीचे अध्यक्षपद बहाल करण्याची सरकारची अजिबात इच्छा नाही. २०१३ मध्ये सरन्यायाधीशपदावरून सेवानिवृत्त झालेले अल्तमास कबिर यांनाही हे पद देण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंतिम निर्णय घेतील. परंतु याबाबतीत काँग्रेसचे मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सदाशिवम यांना राज्यपाल बनविण्याला काँग्रेसने विरोध केला होता.न्या. सदाशिवम यांची कर्नाटकचे राज्यपाल बनण्याची इच्छा होती. परंतु मोदी सरकारने त्यांना केरळच्या राज्यपालपदाचा प्रस्ताव दिला आणि मागच्या वर्षी त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. परंतु आता एनएचआरसीमध्ये अध्यक्षपद रिक्त होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर सदाशिवम यांनी हे पद भूषविण्याची आपली इच्छा व्यक्त केली असल्याचे या सूत्रांनी सांगितले.
राज्यपाल सदाशिवम राजीनामा देणार?
By admin | Published: March 25, 2015 1:46 AM