नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळविल्यानंतर देशातील इतर राज्यांतही आपलं संघटन मजबूत कऱण्यासाठी आम आदमी पक्षाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. बिहार पाठोपाठ 'आप'ने गुजरातमध्येही तयारी सुरू केली आहे. त्यातच आता पाटीदार नेते हार्दिक पटेल आम आदमी पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
या महिन्याच्या अखेरीस आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते गुजरात दौरा करणार आहेत. याच कालावधीत गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांना आम आदमी पक्षाच्या विस्ताराची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आपच्या विजयानंतर हार्दिक पटेल यांनी केजरीवाल यांच्यासोबतचा फोटो शेअर करून त्यांचे अभिनंदन केले होते. तेव्हापासून हार्दिक आपमध्ये जाणार असे अंदाज बांधण्यात येत आहेत.
दरम्यान पाटीदार अनामत आंदोलनाच्या नेत्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. जीपीसीसी आणि पाटीदार आंदोलनाचे नेते अतुल पटेल यांनी या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. हार्दिक काँग्रेससोबत असून काँग्रेससोबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे हार्दिक यांची नजर राज्यसभेवर असल्याचे समजते किंवा गुजरातमध्ये त्यांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी हवी आहे.
हार्दिक यांच्या वाढदिवसाला 'आप' नेते संजय सिंह यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे काँग्रेसवर दबाव बनविण्याची ही रणनिती असू शकते, असही सांगण्यात येत आहे.