- एस. पी. सिन्हारांची : झारखंडमधील राजकीय संकटाची टांगती तलवार असताना गुरुवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात ५ सप्टेंबर रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने सांगितले की, एक दिवसीय पावसाळी अधिवेशन घ्यायचे राहिले आहे. ते पाच सप्टेंबर रोजी बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात सरकार स्वत:च विश्वासमत प्राप्त करू शकते, असे समजले जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. बैठकीत एकूण २५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
एक-दोन दिवसांत स्थिती स्पष्ट होईल - राज्यपालयूपीएच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैंस यांची भेट घेतली. त्यानंतर झामुमोचे सरचिटणीस विनोद पांडेय यांनी सांगितले की, राज्यपालांनी सांगितले की, त्यांना निवडणूक आयोगाकडून पत्र प्राप्त झालेले आहे. यावर एक-दोन दिवसांत कायदेशीर सल्ला घेऊन स्थिती स्पष्ट केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेचा इन्कार करून पांडेय म्हणाले की, राजभवनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे राज्यपालांनी सांगितले आहे. राज्यपालांनी १-२ दिवसांत आपला निर्णय आयोगाकडे पाठविणार आहेत.
बैठकीसाठी रायपूरहून आले मंत्रीराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्र्यांना रायपूरहून रांचीमध्ये बोलावण्यात आले होते. झामुमोच्या कोट्यातील मंत्री आधीपासूनच रांचीमध्ये होते, तर काँग्रेसच्या कोट्यातील ४ मंत्री रायपूरला होते. त्यांना बुधवारी सायंकाळी विशेष विमानाने रांचीमध्ये बोलावण्यात आले होते. राज्यातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्री रायपूरला रवाना होण्याची शक्यता आहे.
आरपीएन सिंह यांच्यावर काँग्रेस फोडण्याची जबाबदारीभाजपमध्ये जाण्यापूर्वी आरपीएन सिंह झारखंड काँग्रेसचे प्रभारी होते. राज्यात काँग्रेस मजबूत उभी करण्यात व सत्तेत वाटा मिळवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तिकीट वाटपापासून ते मंत्री निश्चित करण्यापर्यंत सर्व कामे त्यांनीच केली होती. त्यामुळे काँग्रेस फोडण्याची जबाबदारी भाजपने त्यांच्यावर सोपविली आहे, असे समजते. अनेक आमदार सिंह यांच्या थेट संपर्कात असल्याचे सांगितले जाते. मात्र, कोणताही प्रकार टाळण्यासाठी अविनाश पांडे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.