HMPV Outbreak : भारतात ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरसची (HMPV) अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. २०२० मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर आता HMPV चा संसर्ग होताना दिसून येत आहे. कोरोनासारखाच हा व्हायरस सुद्धा वेगाने पसरवू शकतो, प्रश्न लोकांच्या मनात येत आहे. मात्र, HMPV बद्दल अद्याप अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही आणि तो कोरोनाइतका धोकादायक मानला जात नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये HMPV बद्दल माहिती शेअर केली आहे. या व्हायरसला घाबरून जाण्याची गरज नाही. हा एक जुना व्हायरस आहे, जो श्वसन संसर्गास कारणीभूत ठरतो आणि त्याचे रुग्ण बहुतेक सौम्य असतात, असे त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, लोकांना सर्दीच्या लक्षणांसाठी सामान्य खबरदारी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, प्रत्येक रोगजनकाचा माग काढण्याऐवजी, सर्दी झाल्यावर आपण सर्वांनी सामान्य खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी, निश्चितच मास्क वापरा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, वारंवार हात धुवा आणि गंभीर लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दुसरीकडे, या व्हायरसच्या आगमनाने साथीसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, असे गुरुग्राम येथील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील क्रिटिकल केअर आणि पल्मोनोलॉजीचे प्रमुख डॉ. कुलदीप कुमार ग्रोव्हर यांनी म्हटले आहे. यासंदर्भात दैनिक जागरणने वृत्त दिले आहे. डॉ. कुलदीप कुमार ग्रोव्हर म्हणाले, HMPV हा कोरोनासारखा महामारी होऊ शकत नाही. कारण, बहुतेक लोकांना फ्लूची लस देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती खूप मजबूत झाली आहे, जी त्यांना या व्हायरसपासून वाचवू शकेल.