दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसंदर्भात एका नव्या चर्चेला सुरूवात केली आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करणार आहे का? असा प्रश्न केजरीवाल यांनी केला आहे. एवढेच नाही, तर विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या कामावर पक्ष नाराज आहे का? असा सवालही त्यांनी केला.
केजरीवाल यांनी ट्विट केले आहे, की ''आम आदमी पक्षाचा गुजरातमध्ये वेगाने विस्तार होत आहे. यामुळे भाजपमध्ये पूर्णपणे घबराट निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करणार आहे, हे सत्य आहे का? भूपेंद्रभाई पटेल यांच्या कामावर भाजपही नाराज आहे?''
महत्वाचे म्हणजे गुजरातमध्ये आपला पक्ष मजबूत करण्यासाठी आरविंद केजरीवाल सातत्याने दौरे करत आहेत. यातच त्यांनी असा दावा वजा प्रश्न केला आहे. दर महिन्याला 300 युनिट मोफत वीज आणि 5 वर्षांत सर्व तरुणांना नोकरी, अशी आश्वासने देऊन आपचा भाजपच्या गड भेजण्याचा प्रयत्न आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर, आता आम आदमी पक्ष गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.