कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी गुरुवारी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत (Citizenship Amendment Act) मोठे विधान केले. अमित शाह दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा हे वास्तव असून तृणमूल काँग्रेस त्याबाबत काहीही करू शकत नाही, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बागसह देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. दरम्यान, केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा थंड बस्त्यात ठेवला आहे, असे बरेच दिवस बोलले जात होते.
पश्चिम बंगालच्या सिलीगुडी जिल्ह्यात अमित शाह बोलत होते. यावेळी तृणमूल काँग्रेस अफवा पसरवत आहे की नागरिकत्व कायदा कधीही लागू होणार नाही. पण मी त्यांना सांगू इच्छितो की कोरोना महामारी संपल्यावर आम्ही सुधारित नागरिकत्व कायदा लागू करू. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण सुधारित नागरिकत्व कायदा हे वास्तव आहे, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे अमित शाह यांनी सांगितले.
दरम्यान, अमित शाह यांच्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विधानावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, "ही त्यांची योजना आहे, ते संसदेत विधेयक का आणत नाहीत? ते 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येत नाहीत. मला हे सांगायचे आहे. कोणाच्याही नागरिकत्वाच्या अधिकारांना नुकसान पोहोचेल, असे मला वाटत नाही. आमची एकता हीच आमची ताकद आहे. अमित शाह एका वर्षानंतर इथे आले आहेत. ते प्रत्येक वेळी येतात आणि अशा गोष्टी बोलतात."