शरद गुप्ता -
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सोमवारी दिल्लीत दाखल झाले असून, विरोधी पक्षांना एकत्र करण्यासोबतच कधी केंद्रात सत्तेत राहिलेल्या जनता दलाच्या सर्व घटक पक्षांना एकाच व्यासपीठावर आणणे ही त्यांची प्राथमिकता आहे.
नितीशकुमार यांचे म्हणणे आहे की, जनता दल यू, जनता दल एस, राष्ट्रीय जनता दल, इंडियन नॅशनल लोकदल, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोकदल आणि बिजू जनता दल यासारख्या जनता दलाच्या सर्व घटकांनी सोबत आल्याने जे व्यासपीठ तयार होईल, ते भाजपाला आव्हान देण्यासाठी दुसरी किंवा तिसरी नव्हे, तर पहिली आघाडी ठरेल. हे सर्व पक्ष आपसात विलिनिकरण करून एका मोठ्या पक्षाचे स्वरुप घेऊ शकतात. यातील बहुतांश पक्ष आपापल्या राज्यात एकतर सत्तारुढ किंवा मुख्य विरोधी पक्ष आहेत. देशात विधानसभांमधील एकूण ४२२५ सदस्यांपैकी भाजपाकडे केवळ १३८८ आमदार आहेत. तर, जनता दलाचे कधी घटक राहिलेल्या पक्षांकडे ४२२ सदस्य आहेत. तर, काँग्रेसकडे ६८९ सदस्य आहेत. आगामी दोन वर्षांत होणाऱ्या गुजरात, हिमाचल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहण्याची शक्यता नाही.
नितीशकुमार हे दिल्लीत आयएनएलडीचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला, जद एसचे नेते एच. डी. कुमारस्वामी आदी नेत्यांची भेट घेणार आहेत.
दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. ते बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. नितीशकुमार हे दिल्लीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊ शकतात.
काँग्रेसशिवाय विरोधकांची एकी अशक्य नितीशकुमार यांचे स्पष्ट मत आहे की, काँग्रेसला बाहेर ठेवून भाजपाविरुद्ध कोणतीही आघाडी यशस्वी होणार नाही. नितीशकुमार हे बिहारमध्ये काँग्रेससोबत सरकारमध्ये आहेत.
भाजपला ५० जागांवर रोखणार -- २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ५० जागांवर रोखण्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे स्वप्न आहे. दिल्ली दौऱ्यात त्यांच्यासोबत जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह व मंत्री अशोक चौधरी हेही दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी नितीशकुमार यांची चर्चा होऊ शकणार नाही. - पत्रकारांनी नितीशकुमार यांना विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की, ५० जागांवर रोखण्याबाबत आपण बोललोच नाही. तर, जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी असे आवाहन केले होते की, भाजपाला ५० जागांवर रोखायचे आहे.