Uttarkashi Tunnel Collapse Rescue:उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम अंतिम टप्यात आहे. लवकरच मजुरांना सुखरूप बाहेर काढले जाईल, असे सांगितले जात होते. मजुरांना बाहेर काढण्यासाठी परदेशातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतली जात आहे. यातील एक तज्ज्ञाने मोठा दावा केला असून, त्या ४१ मजूरांना बाहेर काढण्यासाठी अजून १ महिना लागू शकतो, असे म्हटले आहे.
ज्या परदेशी मशीन्सच्या सहाय्याने आतापर्यंतचे खोदकाम केले आणि लवकरच मजुरांना बाहेर काढले जाईल, असा सांगितले जात होते, ती मशीनच आता या बचाव मोहिमेसमोरचा मोठा अडसर बनत असल्याचे म्हटले जात आहे. ज्या मशीनची सर्वाधिक चर्चा होत आहे ती मशीन आता सातत्याने बिघडत आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. तसेच मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी नवनवीन तारखा दिल्या जात आहेत.
४१ मजुरांना बाहेर काढण्यास अजून १ महिना लागणार?
अमेरिकन तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी दिलेल्या नव्या माहितीनुसार, बोगद्यात अडलेले कामगार ख्रिसमसपर्यंत म्हणजेच २५ डिसेंबरपर्यंत त्यांच्या घरी असतील. ते सर्वजण सुरक्षित आहे. बचावकार्य घाईने केल्यास आणखी समस्या वाढू शकतात. त्यामुळे बोगद्यात अत्यंत सावधगिरीने बचावकार्य सुरू आहे, असे डिक्स यांनी म्हटले आहे. डिक्स यांनी आता ऑगर मशीनचा वापर केला जाणार नसल्याचे सांगितले आहे. कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बोगद्याच्या वरच्या बाजूने खोदकाम करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या ड्रिलिंगसाठी लागणारी मशीन बोगद्याच्या वरच्या भागात नेले जात आहे. परदेशी तज्ज्ञांनी केलेल्या या विधानानंतर पीडितांच्या कुटुंबीयांची काळजी वाढल्याचे सांगितले जात आहे. बचाव मोहिमेवर देखरेख ठेवणारे जबाबदार अधिकारी दररोज वेगळी आणि नवनवीन विधाने करताना पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, ४१ मजुरांच्या सुटकेसाठी आणखी बराच वेळ लागू शकतो, असे तर्क या विधानावरून काढला जात आहे. तसेच एकामागून एक अडथळे, अडचणी बचावकार्यात येत आहेत. या बचाव मोहिमेसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पूर्णपणे अमेरिकन ऑगर मशीनवर अवलंबून नाही. एमडीएमए मॅन्युल ड्रिलिंगचा विचार करत आहे. आतापर्यंत ऑगरसारख्या मोठ्या मशीनच्या सहाय्याने खोदकाम करायला इतके दिवस लागले, तर आता कामगार छोट्या मशीन्स आणि अवजारांच्या सहाय्याने खोदकाम करू लागले तर त्यास किती वेळ लागेल? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.