नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारला मागील पाच-सहा दिवसांपासून धोका निर्माण झाला आहे. भाजपकडूनच सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कमलनाथ यांनी हे प्रयत्न हाणून पाडले आहेत. मात्र अशा स्थितीत सरकार दीर्घ काळ स्थिर ठेवणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कमलनाथ लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार करणार, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेसनेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, राज्याच्या अर्थसंकल्पानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात येईल. काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, के.पी. सिंह, आदिवासी नेते बिसाहूलाल सिंह आणि सुमावलीचे आमदार ऐदल सिंह कसाना यांना मंत्रीमंडळात सामील करण्यात येऊ शकते. हे सर्व नेते दिग्विजय सिंह यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते.
या व्यतिरिक्त बहुजन समाज पक्षाच्या आमदारासह अपक्ष आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश सरकारमध्ये अजुनही पाच मंत्रीपद रिक्त आहेत. त्यामुळे नाराज नेत्यांची या मंत्रीपदांवर वर्णी लागू शकते.
दरम्यान मागील पाच दिवसांपासून काँग्रेसचे आमदार बंडखोरी करून भाजपमध्ये सामील होणार असल्याचे वृत्त माध्यमात आले होते. तर काही आमदारांना हरियाणातील हॉटेलमध्ये ठेवल्याचे सांगण्यात आले होते. आता मात्र भाजपच्या आमदारांनी काँग्रेसमध्ये सामील होण्यासाठी कमलनाथ यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.