केसीआर यांची जादू तेलंगणात टिकणार का? असे होते २०१८ चे निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 10:23 AM2023-10-10T10:23:42+5:302023-10-10T10:24:43+5:30
तेलंगणा विधानसभेत ११९ जागा असून, बहुमतासाठी ६० जागा आवश्यक आहेत.
तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) ही तिसऱ्यांदा सलग सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करणार आहे, तर भाजप व काँग्रेसदेखीलतेलंगणात आपली शक्ती अजमावून पाहणार आहेत. तेलंगणात आतापर्यंत केलेल्या विकासकामांवर भिस्त ठेवून बीआरएसचे प्रमुख मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे मते मागतील, तर बीआरएसचे सरकार गेल्या दहा वर्षांत तेलंगणाचा विकास करण्यात कसे अपयशी ठरले यावर काँग्रेस, भाजप निवडणूक प्रचारात भर देणार आहेत.
तेलंगणा विधानसभेत ११९ जागा असून, बहुमतासाठी ६० जागा आवश्यक आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात बीआरएसने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या ११५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. उमेदवारांनी निवडणूक होण्याच्या १०० दिवस आधीपासूनच आपला प्रचार करण्यास व मतदारांपर्यंत जाण्यास सुरुवात केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीप्रमाणे तेलंगणातही काँग्रेस आश्वासने देण्याची शक्यता आहे, असा दावा बीआरएसने केला.
२०१८ चे निकाल -
बीआरएस ८८
काँग्रेस १९
एमआयएम ७
तेलुगु देसम २
भाजप १
अन्य २
एकूण जागा ११९