लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर असा लागेल निकाल, पुन्हा मोदी सरकार की राहुल गांधीचा पलटवार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 11:04 PM2018-01-18T23:04:05+5:302018-01-18T23:07:50+5:30
नोटाबंदी, जीएसटी, वाढती बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध कारणांमुळे केंद्रातील मोदी सरकारविरोधात असंतोष वाढत आहे. अशा परिस्थितीत आजच्या घडीला निवडणुका झाल्या तर काय निकाल लागू शकतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
नवी दिल्ली - अच्छे दिन आणण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार सध्या विविध कारणांमुळे टीकेचे धनी होत आहे. मात्र असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरील जनतेचा विश्वास कायम असल्याचे समोर येत आहे. साडे तीन वर्षांनंतरही देशात मोदी लाट कायम असून आजच्या घडीला लोकसभेची निवडणूक झाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा केंद्रात सत्ता स्थापन करेल, असे एक सर्व्हेमधून समोर आले आहे. सी व्होटर या संस्थेने हा सर्व्हे केला असून, या सर्व्हेमध्ये देशभरातील 543 मतदार संघांमधील जनमताचा कानोसा घेण्यात आला आहे.
नोटाबंदी, जीएसटी, वाढती बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध कारणांमुळे केंद्रातील मोदी सरकारविरोधात असंतोष वाढत आहे. अशा परिस्थितीत आजच्या घडीला निवडणुका झाल्या तर काय निकाल लागू शकतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण मोदींच्या लोकप्रियतेमुळे भाजपा सरकार लोकसभा निवडणुकीत बाजी मारेल, असा अंदाज या सर्व्हेंमधून व्यक्त करण्यात आला आहे. हा सर्व्हे 3 डिसेंबर ते 3 जानेवारी या काळात करण्यात आला होता.
या सर्वेमधील अंदाजानुसार काही प्रमाणात नुकसान होत असले तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपा घवघवीत यश संपादन करू शकतो. तसेच नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलासोबत नव्याने झालेल्या आघाडीचाही भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे.
मात्र 2014 साली ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपाची कामगिरी चांगली झाली आहे, अशा ठिकाणी भाजपाच्या जागांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पण पश्चिम बंगाल आणि ओदिशासारख्या राज्यात तसेच पूर्वोत्तर भारतात भाजपाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या स्थितीत 2014 च्या तुलनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र तरीही भाजपाच्या तुलनेत काँग्रेच्या जागांमध्ये फारशी वाढ होण्याची शक्यता नसल्याचे हा सर्व्हे म्हणतो. मात्र काँग्रेसने स्थानिक पक्षांसोबत आघाडी केल्यास भाजपाच्या अडचणी वाढू शकतात.
पंतप्रधान पदासाठी मोदी सर्वाधिक लोकप्रिय असून, 62.7 टक्के मतदारांनी मोदींना पसंती दिली आहे. तर राहुल गांधीना 12.6 टक्के मतदारांची पसंती आहे. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनाही प्रत्येकी साडे चार टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
आता निवडणुका झाल्या तर कुणाला किती जागा
- रालोआ - 335 जागा आणि 39.7 टक्के मते
- भाजपा - 279 जागा आणि सहकारी 56
- संपुआ - 89 जागा आणि 23.6 टक्के मते
- काँग्रेस 60 जागा आणि सहकारी 29
- इतर पक्ष - 119 जागा