गुलबर्गा (कलबुर्गी) : २०१४च्या मोदी लाटेत काँग्रेसचे एक-एक गड ढासळत असताना गुलबर्गा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा शाबूत ठेवणारे संसदेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांना यंदा गुलबर्गामध्ये एकेकाळच्या आपल्या सहकाऱ्याशीच सामना करावा लागत आहे. दोनदा गुलबर्गाचे मैदान जिंकणारे मल्लिकार्जुन खरगे विजयाची हॅट्ट्रिक साधणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा लोकसभा मतदारसंघाने कायमच काँग्रेसला साथ दिली आहे.पूर्वी हैदराबाद व नंतर म्हैसूर प्रांतात असलेला हा मतदारसंघ १९७७ नंतर कर्नाटक राज्यात समाविष्ट झाला. आतापर्यंतच्या १७ पैकी १५ वेळा काँग्रेसने येथे विजय मिळवला. काँग्रेसचा हा बालेकिल्ला जनता दल व भाजपने एक-एकवेळा भेदला आहे. १९९६ आणि १९९८ वगळता सलगपणे काँग्रेसचा ‘हात’ बळकट करणाºया या मतदारसंघातून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री धरमसिंह यांनीही प्रतिनिधित्व केले आहे.
दिग्गजांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघात यंदा काँग्रेससमोर भाजपचे तगडे आव्हान आहे. काँग्रेसचे चिंचोली विधानसभा मतदारसंघातील आमदार उमेश जाधव यांनाच भाजपच्या तंबूमध्ये आणून त्यांना खरगे यांच्याविरोधात उमेदवारी दिल्याने गुलबर्गाची निवडणूक चुरशीची बनली आहे. जाधव यांचा चिंचोली मतदारसंघ हा मात्र बिदर लोकसभा मतदारसंघात येतो. तरीही भाजपने जाधव यांची गुलबर्गा जिल्ह्यातील लोकप्रियता पाहून त्यांना खरगे यांच्याविरोधात उतरवले आहे.
एकूण १९ लाख २० हजार ९७७ इतके मतदार असलेल्या या मतदारसंघात अफजलपूर, सेदम, चित्तापूर, गुलबर्गा (ग्रामीण) गुलबर्गा (दक्षिण), गुलबर्गा (उत्तर), जेवरगी आणि गुरमटकळ या आठ विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.काँग्रेसचा दलित चेहरासलग ९ वेळा गुलबर्गा ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजयश्री मिळवणारे मल्ल्किार्जुन खरगे हे काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून ओळखले जातात. यूपीए सरकारच्या काळात ते रेल्वेमंत्री होते. कधीकाळी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असणाºया खरगे यांना काँग्रेसने २००९ मध्ये थेट राष्ट्रीय राजकारणात आणले.