नवी दिल्ली - काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि युपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांना लोकसभेत आपल्या जाऊबाई मनेका गांधी यांना स्पीकर मॅडम म्हणण्याची वेळ येऊ शकते अशी स्थिती आहे. सर्वात वरिष्ठ खासदार असल्यामुळे मनेका गांधी प्रोटेम स्पीकर म्हणून निवडल्या गेल्यास त्या सोनिया गांधी यांना खासदारकीची शपथ देऊ शकतात. त्यातच आता त्यांना लोकसभा स्पीकर बनविण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच मनेक गांधी देखील देशातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्याच्या सून आहेत. मात्र मतभेदांमुळे मनेका गांधी आणि सोनिया गांधी यांचे राजकीय मार्ग बदलले. सोनिया गांधी सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा असून युपीए अध्यक्षा आहेत. तर मनेका गांधी सत्ताधारी भाजपच्या खासदार आहेत. या दोघी एकमेकींपासून अंतर ठेवून आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात देखील दोघी कधी चर्चा करताना दिसल्या नाही.
सोनिया आणि मनेका यांच्यातील संबधांवर २०१४ मध्ये मनेका यांच्या टीकेमुळे प्रकाश पडला होता. सोनिया गांधी यांनी माहेराहून हुंड्यात काहीही आणले नव्हते, मग त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून असा सवाल मनेका यांनी केला होता.
आता लोकसभेत अशी स्थिती येऊ शकते की, सोनिया गांधी यांना मॅडम स्पीकर म्हणून मनेका गांधी यांना हाक मारावी लागू शकते. सर्वात वरिष्ठ खासदार असल्यामुळे मनेका गांधी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्या सोनिया गांधी यांना खासदारकीची शपथ देऊ शकतात.