एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : मोक्ष आणि ज्ञानाची भूमी असलेला गया लोकसभा मतदारसंघ गेल्या ५० वर्षांपासून राखीव असून, येथून सातत्याने मांझी समाजाचे उमेदवार विजयी होत आले आहेत.
फाल्गू नदीच्या काठावर वसलेला गया जिल्हा अनेक छोट्या टेकड्यांनी वेढलेला आहे. फाल्गूमध्ये तर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे याला मोक्ष व ज्ञानाची भूमीही म्हणतात. येथेच राजकुमार सिद्धार्थ ज्ञानप्राप्तीनंतर भगवान गौतम बुद्ध बनले. येथे मोठे कारखाने नाहीत, पण गया तिलकुटसाठी (तीळपट्टी) प्रसिद्ध आहे.
गया लोकसभा मतदारसंघ गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून राखीव आहे. १९५२ मध्ये अस्तित्वात आलेल्या या जागेवर पहिल्यांदा काँग्रेसने झेंडा फडकावला होता. त्यानंतर १९५२ मध्येच येथे प्रजा सोशालिस्ट पार्टीचा झेंडा फडकला. १९६७ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला.
मांझी समाजाचे वर्चस्व
- २००९ पर्यंत या जागेवर मांझी समाजाचे उमेदवार विजयी होत आले होते. २०१९च्या निवडणुकीतही येथून विजय मांझी खासदार झाले.
- यावेळीही महादलित समाजातील मांझी यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गयामध्ये एकूण २८,६२,०६० मतदार आहेत. यातील सर्वाधिक मतदार मांझी समाजाचे आहेत.