नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या भेटीदरम्यान पंजाब नॅशनल बँकमध्ये 12,700 कोटी रुपयांचा घोटाळा करुन पलायन करणा-या नीरव मोदीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बँक घोटाळ्यानंतर फरार असलेल्या नीरव मोदीच्या प्रर्त्यापणाची मागणी या बैठकीदरम्यान भारताकडून केली जाऊ शकते. नीरव मोदी सध्या हाँगकाँगमध्ये असून भारताने हाँगकाँगकडे मोदीच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्र्याने गेल्या संसदेच्या अधिवेशनात आपल्या लिखित उत्तरात दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यातील अनौपचारिक शिखर बैठक 27 आणि 28 एप्रिलला होणार आहे. गतवर्षी झालेल्या डोकलामच्या तिढ्यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दरम्यान, यावेळी नीरव मोदीसंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चीननं नीरव मोदीसंदर्भातील निर्णय हाँगकाँगच्या स्थानिक अधिकाऱ्यांवर सोपवला आहे. असे असेल तरीही अंतिम निर्णय चीनकडून घेण्यात येणार असल्याचे सर्वांना माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीरव मोदीचे हाँगकाँगमधील अब्जाधीशांसोबत चांगले संबंध आहेत. नीरव मोदीला भारतात पुन्हा आणल्यानंतर सरकारची प्रतिमा आणखी वाढेल. अशातच चीनकडून या मुद्याचा वाटाघाटी करण्याच्या स्वरुपातही वापर होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
कोण आहे नीरव मोदी ?नीरव मोदी हा हिरेव्यापारी असून त्याची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याला 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. 47 वर्षीय नीरवचे वडील देखील हिरेव्यापारीच होते. नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला. नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.