आरडीएलचे प्रमुख चौधरी जयंत सिंह यांनी शनिवारी जाहीर केलं की ते भविष्यात मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्या विरोधात कधीही निवडणूक लढवणार नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शा यांच्या उपस्थितीत मथुरा-वृंदावन भाजपा उमेदवार हेमा मालिनी यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेत आरएलडी प्रमुख म्हणाले की, "हेमाजी, आम्ही आणि तुम्ही कधीही आमनेसामने निवडणूक लढवणार नाही. यावेळी नाही, पण पुढच्या वेळी मी जेव्हा लोकसभा लढवणार, तेव्हा तुम्ही माझ्या प्रचाराला नक्की या, हे वचन मी घेतो."
जुन्या आठवणींना उजाळा देताना चौधरी म्हणाले, "मी लहानपणापासून हेमाजींचा चाहता होतो, त्यानंतर 2009 मध्ये हेमाजी आमच्या निवडणूक प्रचारात आल्या आणि त्यानंतर आम्ही आमने-सामने (एकमेकांच्या विरोधात) निवडणूक लढवू, हे मला माहीत नव्हतं."
चौधरी यांनी मथुरा येथून आरएलडीचे उमेदवार म्हणून 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली, परंतु 2014 मध्ये ते भाजपा उमेदवार हेमा मालिनी यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी मतदारसंघ बदलला आणि RLD-SP आणि BSP युती अंतर्गत बागपतमधून निवडणूक लढवली, जिथे त्यांचा भाजपाच्या सत्यपाल सिंह यांनी पराभव केला.
"आमच्या आणि हेमाजींमध्ये जर एखादा चित्रपट बनला तर त्याचं नाव '15 साल बाद' असेल, कारण 15 वर्षांपूर्वी हेमाजी आमच्या प्रचारासाठी आल्या होत्या, आम्हाला त्यांचा पाठिंबा मिळाला आणि तुम्ही पूर्ण आशीर्वाद दिला. आता मी त्यांच्यासाठी मत मागत आहे" असं चौधरी यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने चौधरी यांचे आजोबा माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना 'भारतरत्न' दिल्यानंतर चौधरी विरोधी पक्षांची 'इंडिया' आघाडी सोडून एनडीएमध्ये सामील झाले, एनडीएने बागपत आणि बिजनौरच्या जागा आरएलडीला दिल्या आहेत. मथुरेत दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे.