बंगळुरु: सत्ताधारी आघाडीतील १६ आमदारांच्या राजीनाम्याने कोसळण्याच्या बेतात असलेले कर्नाटकचे ए. डी. कुमारस्वामी सरकार सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाला सामोरे जाणार की आणखी काही नवे मुद्दे काढून व नवी खेळी खेळून मतदान टाळले जाते, याविषयीची अनिश्चितता रविवारी सायंकाळपर्यंतही कायम होती.
ठरावावरील मतदान आजच्या आज संपवा, असे राज्यपाल वजुभाई वाला यांनी शुक्रवारी दिलेले दोन आदेश धुडकावून विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांनी तहकूब केलेली विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा सोमवारी सकाळी पुन्हा सुरू होईल. मात्र, प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून काही आदेश मिळविण्याचा व तोपर्यंत मतदान टाळण्याचा प्रयत्न सत्ताधारी आघाडीकडून केले जातील, अशीही शक्यता आहे. राज्यपालांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध आणि बंडखोर आमदारांना गैरहजर राहण्यास मुभा देणारा आदेश बदलून घेण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी याचिका केलेल्या आहेत. बुडत्याला काडीचा आधारा वाटावा तसे या याचिकांकडे पाहिले जात आहे.
आधीच बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे संख्याबळ कुठून आणायचे याची घोर चिंता लागलेल्या सत्ताधारी आघाडीला आणखी एक धक्का बसला. आघाडीला पाठिंबा देणारे बसपाचे एकमेव आमदार एन. रमेश यांनी मतदानाच्या वेळी विधानसभेत न येण्याचे ठरविले आहे. पक्षाने मला अनुपस्थित राहण्यास सांगितल्याने मी मतदारसंघात जाणार आहे, असे महेश यांनी सांगितले.
आर. शंकर व एच. नागेश या दोन अपक्ष आमदारांनी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला असला तरी ते ठरावाच्या विरोधात उघड मतदान करतील याविषयी साशंकता असल्याने विरोधी भाजपने त्यांना गृहित न धरता ठराव फेटालण्यासाठी आपल्या गणिताची आखणी केली आहे.
बंडखोर आमदार ठाममुंबईत पंचतारांकित हॉटेलात मुक्काम ठोकलेल्या काँग्रेसच्या १२ व जद(एस)च्या तीन आमदारांनी रविवारी पुन्हा एक व्हिडिओ प्रसिद्ध करून राजीनामे मागे न घेण्याचा व विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी विधानसभेत न जाण्याचा आमचा निर्धार कायम आहे, असे सांगितले. आम्हाला कोणी बंदूका रोखून कोंडून ठेवलेले नाही. सत्ताधारी आघाडीतील नेत्यांना आमची किंमत नसल्याने स्वाभिमान जपण्यासाठी आम्ही स्वखुशीने राजीनामे दिले आहेत, असा दावा त्यांनी केला. या व्हिडिओमध्ये हे आमदार एका बागेमध्ये डेरेदार वृक्षाच्या पारावरएकत्र बसलेले दिसतात. त्यावरून हा व्हिडिओ मुंबईतील हॉटेलात नव्हे तर शहराबाहेरच्या एखाद्या रिसॉर्टमध्ये काढला असावा,मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष नैतिकतेची बूज राखत दिलेल्या शब्दाप्रमाणे विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतील, अशी आशा आहे. ‘व्हिप’ निरर्थक असल्याने मतदान टाळण्याचे काहीच कारण नाही. आम्ही सोमवारी दु. १२ पर्यंत वाट पाहू व नंतर काय ते ठरवू. - बी.ए. येदियुरप्पा, विरोधी पक्षनेते व भाजपा प्रदेशाध्यक्षमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे?सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला द्यायला जद(एस) तयार झाल्याचे सांगून काँग्रेसचे ‘संकटमोचक’ डी. के. शिवकुमार यांनी अस्थिरतेत आणखी भर घातली. त्यांनी सांगितले की, जद(एस)चे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार, सध्याचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या वा मी स्वत:ही मुख्यमंत्री झाल्याचे जद(एस)ला चालणार आहे. मात्र, जद(एस)कडून यावर कोणताच प्रतिसाद देण्यात आला नाही.