पाटणा - नितीश कुमार यांनी साथ सोडल्याने भाजपालाबिहारच्या सत्तेमधून बाहेर पडावे लागले आहे. धक्कादायक पद्धतीने सत्ता सोडावी लागल्याने भाजपाला मोठा धक्का बसला असून, बिहारमध्ये पुन्हा सत्ता मिळवून आपले पाय भक्कम रोवण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल पूर्णिया मध्ये एका सभेला संबोधित करताना भाजपा कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी नितीश कुमार पुन्हा भाजपासोबत आल्यास त्यांना सोबत घेणार का, या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी मोठं विधान केलं.
नितीश कुमार हे भाजपासोबत येणार का? या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, नितीश कुमार यांच्यासाठी भाजपासोबत येण्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत. नितीश कुमार यांनी स्वत: भाजपाची साथ सोडली आहे. आता माघारी परतण्यासाठी काय उरलं आहे. मागच्यावेळी जेव्हा आरजेडीची साथ सोडून आले होते तेव्हा ती गोष्ट आम्ही समजून घेतली होती. मात्र आता आम्हाला सोडून जाणे समजून घेता येत नाही आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित शाह यांनी काही अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, असं विचारलं असता अमित शाह म्हणाले की, सध्या भाजपाची नजर ही २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर आहे. बिहारमध्ये भाजपाला किमान ३२ जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. ती मोहीम पूर्ण करण्यामध्ये भाजपा गुंतला आहे.
अमित शाहा पुढे म्हणाले की, बिहारमध्ये भाजापाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याची घोषणा लोकसभा निवडणुकीनंतर होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल. बिहारमध्ये भाजप स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला कुठलीही घाई नाही आहे. आमचं पूर्ण लक्ष हे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर आहे.